कोल्हापूर : पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लागल्या रांगा | पुढारी

कोल्हापूर : पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लागल्या रांगा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हिट अँड रन कायद्यांतर्गत ट्रकचालकांना होणार्‍या शिक्षेच्या विरोधात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे; पण पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणार्‍या टँकरचालकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले. दरम्यान, इंधनाचा तुटवडा होणार नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हिट अँड रन कायद्याला विरोध करत देशातील ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. यामुळे सकाळपासून कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-बंगळूर हायवेवर वाहने जिथे आहे तिथे लावून या कायद्याला विरोध करण्यात येत आहे.

दरम्यान, ट्रकचालकांच्या संपामुळे इंधन तुटवडा होणार म्हणून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यास गर्दी केली. दिवसभर अनेक पंपांवर इंधनासाठी रांगा लागल्या होत्या. नववर्षाचे स्वागत पेट्रोल पंपांवर गर्दीने झाले, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. नागरिकांनी वाहनांच्या इंधनाच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्याने काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपले. त्यामुळे पेट्रोल, डिझेल संपले, अशी अफवा पसरल्याने नागरिकांनी इंधन भरण्यास गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपले होते.

दरम्यान, इंधनाचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये होत असल्याने दुपारनंतर डेपोमधून वाहतूक करणार्‍या टँकरचालकांनी वाहतूक पूर्ववत सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, असे तराळ यांनी सांगितले.

Back to top button