Kolhapur Electronic Park : ‘कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक पार्क’ची जागेअभावी परवड! | पुढारी

Kolhapur Electronic Park : ‘कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक पार्क’ची जागेअभावी परवड!

सुनील कदम

कोल्हापूर : केंद्र शासनाने मंजुरी देऊनसुद्धा केवळ जागेअभावी ‘कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक पार्क’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या पाच वर्षांत साकार होऊ शकलेला नाही. जवळपास 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात अपेक्षित असून, या माध्यमातून पाच हजार लोकांना प्रत्यक्ष, तर किमान तितक्याच लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाच्या द़ृष्टिकोनातून हा प्रकल्प मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. (Kolhapur Electronic Park)

केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, शासनाने नंतर ही योजना बंद करून प्रत्येक राज्यात एक ‘इलेक्ट्रॉनिक पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत राज्यातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांतील कंपन्या एका छताखाली आणण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक इलेक्ट्रॉनिक पार्कला 200 एकर जागेसह पायभूत सुविधांसाठी 215 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार होते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक पार्क कोल्हापुरात साकारण्याचे निश्चितही झाले होते. (Kolhapur Electronic Park)

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अ‍ॅग्रो अँड एज्युकेशनच्या (वेसमॅक) पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी तत्कालीन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांची भेट घेऊन हा प्रकल्प कोल्हापुरात साकारण्यासाठी प्रयत्न केले होते. या योजनेंतर्गत कोल्हापुरात इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतल्यास केंद्र शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन संजय धात्रे यांनी यावेळी दिले होते.

200 एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या या पार्कमध्ये जवळपास 300 हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या सामावून घेण्याची क्षमता आहे. सुरुवातीला कोल्हापूर शहरात किंवा शहरालगत, कागल औद्योगिक वसाहत, सांगली रोड आणि टोप-संभापूरदरम्यान या पार्कसाठी जागा सुचविण्यात आली होती. या भागातील काही लोकांनी प्रकल्पासाठी आवश्यक जागा देण्याची तयारीही दर्शविली होती. त्याचप्रमाणे राज्यातील आयटी क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांनी या पार्कमध्ये येण्याची तयारी दर्शविलेली होती.

मात्र, गेल्या पाच वर्षांत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आणि जागेच्या उपलब्धतेच्या बाबतीत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही प्रयत्न न झाल्याने अजूनही हा प्रकल्प साकार होऊ शकलेला नाही. कोल्हापूरच्या मागून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे नव्याने इलेक्ट्रॉनिक पार्कची उभारणी होत आहे. मात्र, इथल्या लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.

द़ृष्टिक्षेपात कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक पार्क

* अपेक्षित गुंतवणूक 3,000 कोटी
* उपलब्ध होणारे रोजगार 5,000
* सहभागी होणार्‍या कंपन्या 300
* जागेची आवश्यकता 200 एकर
* केंद्र शासनाचे अनुदान 215 कोटी
* अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती 5,000

Back to top button