Latest

नाशिककरांना पुन्हा भरली हुडहुडी; पावसाळी वातावरण तयार झाल्याने गारठा वाढला

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पावसाळी वातावरण त्यात सर्वत्र धुळीचे कण यामुळे पुन्हा एकदा शहरात थंडी परतली आहे. वास्तविक नाशिकमध्ये ज्या गतीने पारा घसरतो, त्या तुलनेत रविवारी किमान तापमानाची नोंद जास्त होती. अशातही वार्‍यांमुळे थंडीची लहर बोचत असल्याने, नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात थंडीचा जोर ओसरत असल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याने, हवामानातील गारठा वाढत गेला. परिणामी पुन्हा एकदा थंडी परतल्याचे दिसून आले. रविवारी किमान तापमान 14.8, तर कमाल तापमान 21.6 इतके होते. पण अशातही नाशिककर दिवसभर गारठ्याने त्रस्त झाले होते. रविवारी दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. त्यातच वातावरणात सर्वत्र धुरके पसरल्याने, थंडीचा जोर अधिकच दिसून आले. सायंकाळी विविध ठिकाणी शेकोट्याही पेटविल्याचे दिसून आले. नागरिकांनी उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडणे योग्य समजले. तज्ज्ञांच्या माहितीनुसार वातावरणातील धुरके आणखी 48 तास राहण्याची शक्यता असल्याने, थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र सूर्याचे दर्शन झाल्यानंतर थंडी ओसरत जाईल, असा अंदाजही वर्तविला जात आहे.

शेतकर्‍यांची चिंता वाढली

थंडी ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होऊ शकतो. यामुळे फुलगळती, अळीचा प्रादुर्भाव, मर रोग एवढेच नाही तर पिकांची वाढ खुंटली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT