नाशिक : शाळा आजपासून पुन्हा गजबजणार ; नियमांचे पालन बंधनकारक | पुढारी

नाशिक : शाळा आजपासून पुन्हा गजबजणार ; नियमांचे पालन बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या वर्ग आज  सोमवार (दि. 23) पासून भरणार असून, विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता शाळा व्यवस्थापनांकडून जय्यत तयारीसह वर्गखोल्यांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे संकट असूनदेखील राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातही पहिले ते बारावीपर्यंतच्या शाळा व आश्रमशाळा खुल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार रविवारी (दि. 23) सुटीच्या दिवशीदेखील शहर व परिसरातील विविध शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेचा परिसर व वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करताना स्वच्छतेवर भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रंगरंगोेटी करण्यात येत आहे. तसेच आकर्षक पद्धतीने वर्गखोल्यांची सजावट केली जात आहे. एकूणच ओमायक्रॉनच्या संकटामुळे डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या शाळा या महिन्याच्या प्रारंभी पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. मात्र, शासनाने नियमांचे पालन करीत शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे.

नियमांचे पालन बंधनकारक
शाळा सुरू होत असल्या, तरी पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा पालकांनी घ्यायचा आहे. तसेच कोरोनाचे संकट बघता, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनांवर असणार आहे. एखाद्या शाळेत विद्यार्थी किंवा शिक्षकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्यास, ती शाळा तातडीने बंद करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पाच हजार शाळा
जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे पाच हजार शाळा आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील महापालिका व खासगी मिळून 241 शाळांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या 3,262 तर 663 खासगी शाळा आहेत. आश्रमशाळांची संख्यादेखील मोठी आहे. या सर्व शाळांमधून अंदाजे 10 लाख विद्यार्थी शिक्षण
घेत आहेत.

हेही वाचा :

Back to top button