नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी ( दि. 9 ) नाशिकमध्ये येत असून, विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. राज्यपाल त्या दिवशी नाशिक मुक्कामी असल्याने जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 9) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला कोश्यारी भेट देणार आहेत. तसेच सायंकाळी राज्यपालांच्या उपस्थितीत पाथर्डी फाटा येथील एसएसके क्लबमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृह येथे रात्री राज्यपाल मुक्कामी असणार असून, रविवारी (दि.10) सकाळी ते मुंबईकडे रवाना होतील.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे व पालकमंत्री छगन भुजबळ आदी राज्यपालांच्या दौर्याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दौर्याप्रसंगी कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.