नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
जे घडायचं ते घडून गेलं. जे घडवायचं त्यावर आता सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन विचार करायचा आहे. शिवसैनिकांनी खचून जायचं नाही, आता रडायचं नाही तर लढायचं आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेला पुन्हा घराघरांत पोहोचवायचे आहे, असा एल्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनंत गिते यांनी सातपूरला शिवगर्जना मेळाव्यात केला.
उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या शिवगर्जना मेळाव्यासाठी शिवसेनेचे निष्ठावंत उपस्थित होेते. शुभांगी पाटील, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, शिवसेना नेते सुनील बागूल, वसंत गिते, विजय औटी, संजना घाडी, वरुण सरदेसाई, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, देवा जाधव, विनायक पांडे आदींसह ३३ नगरसेवक उपस्थित होते.
अनंत गिते यांनी फुटीर शिंदे गट, भाजपवर आपल्या भाषणात सडकून टीका केली. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा असताना शिंदे आणि फडवणीस राजकारणात मश्गुल आहेत. राज्याच्या विकासाची दैनावस्था झालेली आहे. हे चित्र पालटून टाकण्यासाठी आगामी निवडणुकीत सत्तेचा सुकाणू पुन्हा आपल्या हाती आणायचा आहे आणि त्यासाठी निष्ठावंतांनी पेटून कामाला लागावे, असे आवाहन गिते यांनी केले.
मतदारसंघ निवडणुकीपुरता असतो. निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचा विचार करून विकासकामे करावे लागतात. सध्याचे राजकारण भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे सुरू आहे. परंतु राज्यातील जनतेच्या मनातील स्क्रिप्ट निवडणुकीनंतरच कळेल, असा टोला विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी लगावला.
मंत्रिमंडळ का नाही : संजना घाडी
ज्यांना अजूनही पक्ष सोडून बाहेर पडायचं आहे त्यांनी आताच बाहेर पडा. कारण आता आम्हाला शिस्तबद्ध काम करायचे आहे. निवडणुकीची तयारी करून गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे. शिवसैनिक व पदाधिकारी यांनी आता घराघरांत पोहोचवून सत्य सांगायचे आहे. सरकारने गॅस सिलिंडरचे दर भरमसाट वाढवून चुलीत लाकडे टाकण्याची वेळ राज्यातील महिलांवर आणली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. मंत्री व आमदार पळून जातील, या भीतीने अजून मंत्रिमंडळ बनवले नाही. यामुळे विकासकामे होत नाहीत, अशी टीका शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी यांनी केली.
जनता उद्धव ठाकरेंबरोबरच : सरदेसाई
खोक्यांच्या बळावर आमदार, शिवसेना नाव, पक्षचिन्ह चोरले. गद्दारांना वाटतंय शिवसेना संपली. परंतु या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रामधील सर्वसामान्य जनता चिडली आहे. राज्यातील ७५ टक्के जनता उद्धव ठाकरेंसोबत आहे, असा दावा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केला.
३३ नगरसेवक ठाकरेंबरोबरच : शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे गटनेते विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्राची जनता दूधखुळी नसून, ती गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवेल. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले ४० पैकी ३३ नगरसेवक कोणत्याही आमिषाला बळी न पडता उद्धव ठाकरेंसोबत आहेत. नगरसेवक व पदाधिकारी फोडण्यासाठी राज्यात एजंटगिरी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
चिन्हासाठी सौदेबाजी : बडगुजर
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनोगतात गेल्या जून महिन्यात ४० आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केल्याने महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झाले. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन हिंदुत्वाचे कारण देत पाठीत खंजीर खुपसला. परंतु यांनी केवळ खोके मिळवण्यासाठी गद्दारी केली. चिन्ह व पक्षाचे नाव मिळवण्यासाठीदेखील सौदेबाजी झाली. या आत्मघातकी निर्णय घेणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला.
तर वसंत गिते यांनी जिल्ह्याच्या नामांतरचा निर्णय पोटनिवडणुकीसमोर ठेवून केला. तसेच मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री व भाजपने सांगितल्याप्रमाणे प्रतिक्रिया व निर्णय घेतात, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला.
शुभांगी पाटील, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, शिवसेना नेते सुनील बागूल यांचीही भाषणे झाली. माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर विनायक पांडे, नगरसेविका नयना गांगुर्डे, हेमलता कांडेकर, सीमा निगळ, उषा शेळके, मधुकर जाधव तसेच डॉ. वृषाली सोनवणे, सविता गायकर, प्रेम पाटील, धीरज शेळके, इंद्रभान सांगळे, विलास आहेर, योगेश गांगुर्डे, कलावती सांगळे, गोकूळ नागरे, सॅम फर्नांडिस, समाधान देवरे, नरेश सोनवणे, वैशाली देवरे, नंदू जाधव, गोकुळ निगळ, गोकुळ तिडके आदींसह नाशिकसह सातपूर विभागातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा :