पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जून-2023 मध्ये होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा पूर्वपरीक्षेची तारीख प्रसिद्ध करत मुख्य परीक्षाही पहिल्यांदाच ऑनलाइनद्वारे होणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु एमपीएससीकडे तशी सक्षम यंत्रणा आहे का, असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत. नव्या अभ्यासक्रम लागू करण्यावरून सध्या स्वायत्त संस्था असलेली 'एमपीएससी' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
उमेदवारांच्या आंदोलनानंतर नवा अभ्यासक्रम आणखी दोन वर्षांनी लागू करण्याचा निर्णय घेत आयोगाने उमेदवारांना दिलासा दिला आहे. आयोगाने टप्प्याटप्प्याने सर्व परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑनलाइनद्वारे होण्यासाठी आयोगाने यापूर्वीच टेंडर प्रक्रिया आणि कंपनीशी सामंजस्य करारही झाले आहेत. यापूर्वी सरळ सेवा भरतीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. त्यानंतर सर्व यंत्रणेची खातरजमा झाल्यानंतर आयोगाने मुख्य परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होत होती. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास वेळ जात होता. आता मात्र ऑनलाइन परीक्षांमुळे निकालाची प्रक्रिया गतिमान होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारांना उत्तरेही तत्काळ ई-मेलद्वारे पाठविणे शक्य होणार आहे.
विश्वासार्हतेवर प्रश्न
सुमारे दोन-तीन लाखांहून अधिक परीक्षार्थी संख्या असलेल्या एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षेवर उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार उजेडात आला होता. लाखो उमेदवारांची एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आयोगाची यंत्रणा सक्षम आहे का, परीक्षा पादर्शकता होईल का, याविषयी उमेदवारांमध्ये संभ—म असल्याचे चित्र दिसून येत आहे.