पुणे : पुढारी वृत्तसेवा: अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांकडूनही 'घासून येऊ; पण आम्हीच येऊ' असे सांगत विजयाचा दावा केला जात आहे. हे सांगताना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसह प्रमुख नेत्यांकडून किमान 5 ते 10 हजार मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात सरळ सामना रंगला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यात मतदानाचा टक्काही अपेक्षापेक्षा वाढला असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
आता दोन्ही पक्षांच्या उमेदवार आणि नेतेमंडळींकडून मात्र आम्हीच जिंकणार, असा दावा केला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ते किमान 10 हजार मतांनी विजयी होतील, असा दावा केला. पूर्व भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, मला त्या ठिकाणी चांगले मताधिक्य मिळेल. याशिवाय सदाशिव, नारायण, शनिवार या पेठांमध्ये आपल्याला चांगली मते मिळतील. त्यामुळे माझा विजय पक्का असल्याचा दावा धंगेकर यांनी केला. तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनीही 15 ते 20 हजार मतांनी विजयी होऊ, असा दावा केला आहे. प्रामुख्याने पश्चिम भागात मोठे मताधिक्य मिळेल आणि पूर्व भागातही आपण विजयी आघाडी घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी धंगेकर हे 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होतील, असे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी एकत्र येऊन काम केल्याने मतदानाचा टक्का वाढला. त्यामुळेच आमचा विजय अधिक सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विजय आमचाच होणार असल्याचे म्हटले आहे. कसबा मतदारसंघात हक्काच्या मतदारांबरोबरच इतर मतदारही मतदानासाठी बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो. संघटनेच्या पातळीवरील कामाने रासने हे विधानसभेत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यांनी शहराच्या विकासकामाबाबत घेतलेल्या निर्णयाचा या निवडणुकीत फायदा होईल. भाजपबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्याने महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की असल्याचे भानगिरे म्हणाले.
काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच भाजपचा नैतिक पराभव झाल्याची टीका केली. ते म्हणाले की, ज्या पध्दतीने भाजपने ही निवडणूक लढविली, महागाई, भ्रष्टाचार याचा पैसा ओतला. तरीही त्यांचे पैसे घेऊन मतदारांनी आम्हालाच साथ दिली आहे. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.