Latest

नाशिक : पाण्यासाठी दाही दिशा; वाड्या-वस्त्यांवरील महिलांची पाण्यासाठी होतेय वणवण

अंजली राऊत

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील पेगलवाडी, धुमोडी आणि टाके हर्ष येथे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

पेगलवाडी येथे जून 2022 पासून 70 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. जवळपास 90 टक्के रक्कम खर्च झाली आहे. मात्र, आज या गावाला टँकरचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे. टाके हर्ष येथे वीजपुरवठा होत नसल्याने मागच्या आठ महिन्यांपासून विहीर अथवा नदीवर महिला पाण्यासाठी हंडे घेऊन जातात. धुमोडी येथेही वेगळी परिस्थिती नाही. ग्रामस्थ विकत टँकर घेऊन तहान भागवत आहेत. विशेष म्हणजे याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अद्यापही बेफिकीर असल्याचे दिसते. वास्तविक त्र्यंबक तालुक्यात आजच्या घडीला 85 योजनांची कामे सुरू आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी मागच्या काही दिवसांत वेळोवेळी आढावा घेतला. मात्र, या कामांबाबत प्रगती होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जिल्हा परिषद नाशिक यांचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. तालुक्यात 85 योजनांसाठी सव्वाशे कोटींहून अधिक खर्च झाला आहे. सन 2022 पासून सुरू असलेल्या योजनांच्या कामांबाबत अत्यंत विदारक परिस्थिती आहे. आजच्या स्थितीला 10 योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. बहुतांश योजना 30 ते 40 टक्के कामांत अडकलेल्या आहेत, तर अवघ्या 7 योजना 90 टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. अर्थात प्रगतीची टक्केवारी फक्त कागदोपत्री आहे. पंप हाऊस बांधणे, वितरण व्यवस्था तयार करणे आणि जलकुंभ बांधणे या कामांची प्रगती आहे. मात्र, प्रत्यक्ष पाण्याचा उद्भव आहे किंवा नाही, याची काळजी संबंधित यंत्रणांनी घेतलेली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करताना अस्तित्वातील विहिरींवर अवलंबून असलेल्या योजना आज पाणीपुरवठा करण्यास कुचकामी ठरल्या आहेत. उन्हाळयाचा उच्चांक गाठला आहे आणि आता विहिरी खोदण्याचा अथवा नव्याने जलस्रोत शोधण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसते.

– 25 कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही बहुतांश भागांत टंचाई
– पाणीपुरवठ्याच्या 85 योजनांपैकी 10 योजनांच्या कामांना मुहूर्तच नाही
– 75 योजना मागच्या दोन वर्षांपासून प्रगतिपथावर
– टँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात
– सरकारी यंत्रणा निवडणुकीत व्यग्र

टँकर प्रस्ताव रखडणार?
यावर्षी टँकर सुरू करताना ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव स्वीकारण्याचे काम करणार आहे. मात्र या विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता आदी जबाबदार अधिकारी याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने आणि सरकारी कर्मचारी आता निवडणुकीत व्यग्र झाल्याने टँकर प्रस्तावांचा प्रवास रखडण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, देवगाव भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मागच्या अंदोलनात सुटला नाही. त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी देवगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे, याबाबतचे पत्र पंचायत समिती कार्यालयास देण्यात आले आहे.

शासन यंत्रणांच्या उदासीन कारभाराने कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, आजही तालुक्यातील ग्रामस्थांना नळाचे पाणी उपलब्ध नाही. पाण्यासाठी रानोमाळ शोध घ्यावा लागतो. तसेच अशुद्ध पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.– भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT