Lok Sabha Election 2024 : तेच मैदान… आणि दोन सभा

Lok Sabha Election 2024 : तेच मैदान… आणि दोन सभा
Published on
Updated on

निवडणुकांच्या रणांगणात नेत्यांच्या जाहीर सभा हा जय-विजयाच्या माहोलवर दूरगामी परिणाम करणार्‍या असतात. एखादी सभा जनमानसाची नस पकडते आणि पाहता पाहता सारे वारे फिरून जाते. अशा सभांपैकी कोल्हापुरात झालेल्या दोन सभा गाजल्या होत्या आणि अजूनही त्या सभांची आठवण दिसते. या दोन सभांपैकी एक होती ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून प्रख्यात असलेले पु. ल. देशपांडे यांची. दुसरी सभा श्रीमती इंदिरा गांधी यांची. दोन्ही सभा झाल्या त्या वरुणतीर्थ वेस मैदान अर्थात गांधी मैदानावर. पहिली सभा झाली, ती मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून, तर दुसरी झाली मध्यरात्री चंद्रप्रकाशात. दोन्ही सभांवेळी मैदान तुडुंब भरले होते आणि सभेला उत्स्फूर्त गर्दी झाली होती. (Lok Sabha Election 2024)

26 जून 1975! देशाच्या लोकशाही प्रणालीवर आघात झाला. आणीबाणी लादली गेली. बडे बडे विरोधी पक्षनेते गजाआड झाले. संजय गांधी यांच्या वीस कलमी कार्यक्रमात उत्तर भारतात बरेच अत्याचार घडले. या सार्‍या घडामोडीतून लोकांमध्ये संतापाचा ज्वालामुखी खदखदत होता. (Lok Sabha Election 2024)

आणीबाणी संपणारच नाही, असे वाटत असतानाच 18 जानेवारी 1977 रोजी इंदिराजींनी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. विरोधी नेते तुरुंगाबाहेर पडले. विरोधी पक्षांची वज्रमूठ उभी राहिली. जनता पक्षाची स्थापना झाली आणि देशात एक नवे उत्साही वारे खेळू लागले. आणीबाणीला अनेक साहित्यिकांनी, विचारवंतांनी विरोध केला होता. कराड साहित्य संमेलनात संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत यांनी सरकारवर तोफ डागली होती, तर आणीबाणीला विरोध करणारे एक निवेदन विचारवंत आणि साहित्यिकांनी प्रसिद्ध केले होते. पु. ल. देशपांडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुका जाहीर होताच पु. ल. यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. (Lok Sabha Election 2024)

पु. ल. देशपांडे यांनी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर असा झंझावाती दौरा केला. त्यात त्यांनी कोल्हापुरात शनिवार दि. 12 मार्च 1977 रोजी वरुणतीर्थ वेस मैदानावर विराट सभा घेतली. सभेमध्ये तरुणांची मोठी संख्या होती. हे वरुणतीर्थ नव्हे तर तरुण तीर्थ आहे, अशी आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या तळमळीच्या भाषणात विनोदाची पखरण करीत त्यांनी सभा कब्जात घेतली. या सभेने कोल्हापुरातील वातावरण बदलले आणि काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष या लढतीत शेकापचे दाजिबा देसाई 165 मतांनी निवडून आले. लढत किती अटीतटीची होती आणि या विजयात पु. ल. यांच्या सभेचा कसा मोठा वाटा होता, हे लक्षात येतेच. (Lok Sabha Election 2024)

1977 च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले. जनता पक्ष स्थापन झाला. या पक्षाने केंद्रात असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली, त्यानंतर केंद्र सरकारने श्रीमती गांधी, संजय गांधी यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडली. आय काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशी शकले झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पायउतार झाले आणि चौधरी चरणसिंग पंतप्रधान पदावर आले. पण ऐनवेळी आय काँग्रेसने चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. बहुमताला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी राजीनामा दिला. पुन्हा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि इंदिरा गांधी यांच्या देशभर झंझावाती सभा सुरू झाल्या. त्यापैकीच कोल्हापूरची मध्यरात्र उलटून गेल्यावर झालेली आणि गाजलेली सभा. ती तारीख होती, मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 1980. जनता दलाच्या राजवटीने भ्रमनिरास झालेल्या लोकांचा वरुणतीर्थ वेस मैदानाकडे लोंढा लागला होता. जनसमुदायात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सभेची वेळ होती रात्री 8-00 वाजताची. पण इंदिराजींचा दौरा मॅरेथॉन होता. सातारा, कराड, सांगली, इचलकरंजी अशा सभा घेत आणि वाटेवर त्यांना पाहण्यासाठी थांबलेल्या जनसमूहाला संबोधित करीत त्या कोल्हापुरात पोहोचल्या तेव्हा रात्रीचा पाऊण वाजला होता. (Lok Sabha Election 2024)

इंदिराजींची सभा आठ वाजता होणार, म्हणून जाहीर झाले होते. पण सहा वाजताच मैदान भरले होते. आठ वाजताची सभेची वेळ. पण साडेचार तास उलटले तरीही लोक थांबले होते. पाऊण वाजता इंदिराजी आल्या आणि लोकांच्या भावनांना हात घालीत त्यांनी घणाघाती भाषण केले. महिलांचे मंगळसूत्रही आता या सरकारने महाग केले, असे सांगत त्यांनी महिलांच्या काळजाचा ठाव घेतला. जनता सरकारवर टीकेचा भडिमार केला, त्यांनी सभा जिंकली आणि 1980 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. तीनच वर्षांत विश्वास बसू नये, असे राजकारणाने वळण घेतले. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news