आता आला, चक्क गुलाबजाम वडा! | पुढारी

आता आला, चक्क गुलाबजाम वडा!

नवी दिल्ली : हल्ली खाद्यपदार्थांचे इतके भन्नाट ‘फ्युजन’ पाहायला मिळत आहेत, की ते पाहून हसावे की रडावे, हे कळत नाही. स्ट्रीट फूडच्या नावाखाली हल्ली विविध प्रयोग पाहायला मिळत आहेत. कोणी मॅगीची भजी बनवतोय, तर कोणी चहामध्ये चिकन शिजवतोय, कोणी बिस्किटांचं ऑम्लेट करतोय, तर कोणी अंड्यापासून पाणी-पुरी तयार करतोय. हे सर्व पदार्थ कमी होते म्हणून की काय, आता बाजारात आणखी एक अजब पदार्थ समोर आलाय. या पदार्थाला गुलाबजामचा वडा, असं म्हणतात!

होय, नाव ऐकूनच चकित झालात ना? पण हे खरं आहे. खरोखरच हा वडा चक्क गुलाबजामपासून तयार केला जातोय. मात्र, ही रेसिपी पाहून वडापाव प्रेमी नाराज झाले आहेत. अनेक लोक या वड्याची फिरकी घेत आहेत. साधारणपणे कुठलाही वडा कसा तयार केला जातो? तर बटाट्याची भाजी करून तिचे गोल गोळे तयार केले जातात. अन् मग या गोळ्यांना बेसनमध्ये मिक्स करून तेलामध्ये छान तळलं जातं. खरं तर ही एक क्लासिक रेसिपी आहे. शिवाय ही रेसिपी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रियही आहे.

आता तर जगभरात याच रेसिपीतून तयार होणारा वडा मोठ्या आवडीनं खाल्ला जातो. पण, आपल्या देशात प्रयोगशील लोकांची कमतरता नाही. अशाच एका प्रयोगशील विक्रेत्यानं ही नवी रेसिपी शोधून काढली आहे. त्यानं गुलाबजाम बेसनमध्ये मिक्स केले आणि तेलात तळून काढले आणि अशा पद्धतीनं तयार होतात गुलाबजाम वडे! काही जण या प्रकाराला गुलाबजामची भजी देखील म्हणतात.

Back to top button