Latest

नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच

गणेश सोनवणे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीच्या पवित्र रामकुंडामध्ये अस्थी विलय होत असल्याचे पोथी-पुराणांत सांगितले जात असल्यामुळे देशभरातील नागरिक अस्थिविसर्जनासाठी येत असतात. परंतु रामकुंडातील तळाच्या काँक्रिटीकरणामुळे कुंडामध्ये 'अस्थी विलय' होत नसून, अक्षरश: अस्थींचा खच जमा होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रामकुंडातील अस्थी विलय कुंड तातडीने पुनरुज्जीवित करण्याची मागणी गोदाप्रेमींनी केली आहे.

सन २००२-०३ च्या कुंभमेळ्यासाठी गोदापात्राचे काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काँक्रिटीकरण काढण्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मनपाला काँक्रीट काढण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार मनपाने नदीपात्रातील काँक्रीट काढण्याच्या कामाला सुरुवात केली. हे काँक्रीट काढण्याचे काम दुतोंड्या सांडवा ते गाडगे महाराज पुलापर्यंत काढले गेले. उर्वरित काँक्रीट काढण्याचे काम सुरू असताना, रामकुंड, गांधी तलाव आदी ठिकाणचे तळ काँक्रीट काढण्यासाठी स्थानिक नागरिक विरोध करत असल्याचा आरोप गोदाप्रेमींनी केला आहे. दरम्यान, मनपाकडून मंगळवारी (दि. ७) करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी रामकुंडात अस्थींचा मोठा खच दिसून आला. यामुळे संतप्त गोदाप्रेमींनी रामकुंडावरील हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे मूळ अस्थी विलय कुंडदेखील नामशेष झाले आहे. आता प्रशासनाने रामकुंडातील काँक्रिटीकरण काढण्याची मागणी गोदाप्रेमींनी केली आहे.

…होते गरम पाण्याचे झरे

सध्या ज्या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्या जातात, त्याठिकाणी पूर्वी अस्थी विलय कुंड होते. काँक्रिटीकरण करण्यापूर्वी या कुंडावर लोखंडी जाळी होती. त्याखाली गरम पाण्याचे झरे असल्याचे येथील जुने-जाणकार नागरिक सांगतात. त्यामुळेच येथे विसर्जित केलेल्या अस्थी विलय होत असतील, असे अनेकांचे म्हणणे आहे.

अस्थींचे विघटन होते आणि मृताच्या आत्म्याला शांती मिळते. परंतु गोदापात्रात तळ काँक्रीट झाल्यानंतर या कुंडात रासायनिक प्रक्रिया होत नाही. अस्थींचे विघटन (पाणी) होत नसल्यामुळे अस्थींचा खच रामकुंडाजवळ साचलेला असतो. कुंड स्वच्छतेच्या नावाखाली या अस्थी कचरा डेपोत जातात. हे सर्व थांबवायचे असेल तर रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

– देवांग जानी, अध्यक्ष तथा याचिकाकर्ते, गोदाप्रेमी सेवा समिती

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT