नगर : व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न ; बाबुर्डी बेंद येथे टोळक्याचा कोयत्याने हल्ला | पुढारी

नगर : व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न ; बाबुर्डी बेंद येथे टोळक्याचा कोयत्याने हल्ला

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात शेतीच्या वादातून बुधवारी (दि.8) तुफान राडा झाला. नगरमधील बांधकाम व्यावसायिक व शेती मालक आणि त्याच्या साथीदारांवर 20 ते 25 जणांच्या जमावाने तुफान दगडफेक केली. एकावर कोयत्याने वार करत त्याच्या जवळ असलेली परवाना असलेली रिव्हॉल्वर हिसकावून घेत त्याच्या डोक्यास लावून ठार मारण्याचीही धमकी दिली. नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 5 जणांना पकडले असून, आरोपींनी पळविलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.
याबाबत नगरमधील शेती व बांधकाम व्यावसायिक उत्कर्ष सुरेश पाटील (वय 44, रा.श्रमिक, आनंदऋषिजी मार्ग, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात शेतजमीन आहे. बुधवारी (दि.8) दुपारी 12 च्या सुमारास ते बाबुर्डी बेंद शिवारात हॉटेल राजवीर जवळ असलेल्या त्यांच्या शेतात काही सहकार्‍यांसह गेले होते.

त्यांच्या जमिनीत असलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने काढत असताना तेथे राजवीर हॉटेलचा मालक मनोज चोभे (रा.बाबुर्डी बेंद, ता.नगर) याच्यासह 20 ते 25 जण आले. त्यांनी पाटील यांच्याशी जमिनीवरून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने या जमावाने पाटील व त्यांच्या सहकार्‍यांवर तुफान दगडफेक सुरू केली. मनोज चोभे याने अगोदर लोखंडी गजाने पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमधून चिकन कापण्याचा कोयता आणून पाटील यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अनेक वार केले. या गडबडीत पाटील यांच्या कमरेला अडकविलेली परवाना असलेली रिव्हॉल्व्हर मनोज चोभे याने हिसकावून घेत पाटील यांच्या डोक्यास लावून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

हा सर्व तुफान राडा सुरू असताना कोणीतरी पोलिसांना फोन केला. हे समजताच मनोज चोभेसह सर्वजण पाटील यांची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर घेऊन तेथून पसार झाले. थोड्याच वेळात सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हे पथकासह तेथे दाखल झाले व त्यांनी आरोपींची धरपकड सुरु केली. सायंकाळपर्यंत यातील 5 आरोपींना पकडण्यात आले. पाटील यांची आरोपींनी पळवून नेलेली रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आली.

उत्कर्ष पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोज चोभेसह 20 ते 25 जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दत्तात्रय उर्फ मनोज बाजीराव चोभे (रा.बाबुर्डी, ता.नगर), संदीप रावसाहेब कासार (रा. वाळकी, ता.नगर), अनिल नारायण उमाप (रा.खडकी, ता.नगर), आदित्य बाळासाहेब बांदल, नितीन रमेश राऊत (दोघे रा. हॉटेल राजवीर, बाबुर्डी बेंद, ता.नगर) या 5 जणांना अटक केली आहे. इतर आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अटक आरोपींना गुरुवारी (दि.9) दुपारी उशिरा न्यायालयात हजार करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग हे करीत आहेत.

Back to top button