पुणे : 20 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय | पुढारी

पुणे : 20 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील 20 टक्के अभ्यासक्रम मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (मूक) अथवा स्वयंम या ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. यूजीसीच्या नियमावलीनुसार मूक अथवा स्वयंम किंवा तत्सम ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू करण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची समिती नेमण्यात आली होती.

या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व त्यासंदर्भात रूपरेषा ठरविण्यासाठी डॉ. एम. जी. चासकर यांच्या समितीने अहवाल सादर केला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठ शैक्षणिक विभागातील सर्व अभ्यासक्रम व संलग्न महाविद्यालये तसेच मान्यताप्राप्त संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. हा ऑनलाइन अभ्यासक्रम हे केवळ वैकल्पिक अथवा जादा क्रेडिटसाठी करण्यास परवानगी राहणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Back to top button