Latest

नाशिक : अपूर्व हिरेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असून, याबाबतचा खुलासा खुद्द महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात केला आहे.

सिडकोतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २३) पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी बडगुजर यांनी हिरे संस्थेचा संदर्भ देत याबाबतचा खुलासा केला. अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ अपूर्व हिरेही ठाकरे गटात येणार असून, त्यादृष्टीने त्यांनी मुंबईत पक्ष नेत्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून, स्थानिक स्तरावरील पदाधिकारी एकापाठोपाठ शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. अशात अद्वय हिरेंपाठोपाठ अपूर्व हिरे हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याने, ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल. अद्वय हिरे यांनी मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्यामुळे मालेगाव बाह्यचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, अपूर्व हिरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी हा मतदारसंघ सोडून बोला, असे त्यांना सांगण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गेली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी आमदार सीमा हिरे यांना चांगली टक्कर दिली होती. अशात यंदाही ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने, ठाकरे गटात त्यांचा प्रवेश कोणत्या अटीवर होणार याबाबत चर्चा रंगत आहे.

ठाकरे गटाकडून पर्याय

अपूर्व हिरे हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असले, तरी या मतदारसंघात ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे प्रबळ दावेदार आहेत. अशात हिरे यांना स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक मतदारसंघ या दोन विधान परिषदेचे तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाचा पर्याय ठाकरे गटाकडून उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT