पुणे : मान्सूनची वर्दी; खरेदीला गर्दी | पुढारी

पुणे : मान्सूनची वर्दी; खरेदीला गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भमार्गे मान्सून दाखल झाल्याची वर्दी मिळताच बाजारात छत्री, रेनकोट, पावसाळी पादत्राणे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. यंदा अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडल्याने नागरिकांनीही पावसाळी साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली होती. अखेर शहरात मान्सून दाखल होताच शनिवारी (दि.24) सकाळपासूनच नागरिकांची पावले खरेदीसाठी दुकानांकडे वळल्याचे दिसून आले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्री, रेनकोट, पावसाळी पादत्राणे घेण्यासाठी दुकाने नागरिकांच्या गर्दीने गजबजून जातात. त्या पार्श्वभूमीवर विक्रेतेही मोठ्या प्रमाणात मालाचा साठा करतात. दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होऊन पावसास सुरुवात होते. मात्र, जून महिनाअखेरच्या टप्प्यात येऊनही पावसाची कोणतीही चिन्हे नसल्याने नागरिकांनी पावसाळी साहित्याच्या खरेदीसाठी फारसा उत्साह दाखविला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुकानातील व्यवहार मंदावून विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

थ्री फोल्ड अम्ब्रेला, कार्टून रेनकोटची क्रेझ
बाजारात नवीन ट्रेंड असलेल्या छत्र्या आणि रेनकोट दाखल झाले आहेत. तरुण मंडळींसाठी वॉटर प्रिंट, ट्रान्सपरन्ट, चेन, मिड टॉप, लॉग टॉप आदी रेनकोट उपलब्ध आहेत. पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्सपरन्ट आदी प्रकारच रेनकोटही दाखल आहेत.
छत्री, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट आदींना तरुणाई पसंती देत आहेत. याखेरीज, सॅक कव्हर, स्कूटर कट रेनकोटला मोठी मागणी आहे.

ताडपत्रीसाठी बोहरी आळी, जुना बाजार परिसरात गर्दी
पावसाळ्याची चाहुल लागता बोहरी आळीतील आदिनाथ चौकातील ताडपत्री विक्रेत्यांची बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली आहे. अनेक रंगांतील आणि विविध प्रकारच्या ताडपत्र्या उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळ्यात घराच्या पत्र्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी, दुचाकी-चारचाकींवर आवरण चढविण्यासाठी, दुकानांत माल झाकण्यासाठी आदी विविध कारणांसाठी ताडपत्री वापरली जाते. ताडपत्र्या अडीच ते चार रुपये प्रतिचौरस फूट दराने उपलब्ध आहेत. पुण्यातील खडकी, वडकी, हडपसर, कोंढवा, बोपदेव घाट परिसरातील प्लास्टिकच्या कारखान्यातून ताडपत्री बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. बाजारात 200 ते 500 रुपयांपर्यंत छत्री, तर 500 रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत रेनकोट उपलब्ध आहेत. ऑफीस तसेच शाळा सुरू झाल्या तरी अपेक्षित मागणी नव्हती. मात्र, मान्सून दाखल झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

 

Back to top button