Latest

Narayan Rane : रमेश मोरेची हत्या कोणी आणि का केली? अजून खोलात जाईन, नारायण राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाची तपासणी व केलेल्या बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के-पश्चिम विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे नारायण राणे संतप्त झाले आहेत. दरम्यान, आज नारायण राणे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत जुहूतील घराबाबत महत्वाचा खुलासा केला. नियम पाळून आणि कायदेशीर मार्गाने इमारत बांधली आहे. पण दुष्टपणाने सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. ही कसली दुश्मनी? असा सवाल उपस्थित करत मी शरण येणारा नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना सुरु केली. पण शिवसेना प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, असा गंभीर आरोप राणेंनी केला.

रमेश मोरेची हत्या कोणी आणि का केली. आम्हाला माहिती नाही का? अजून खोलात जाईन, असा इशारा देत नारायण राणे यांनी जुन्या प्रकरणाला हात घातला. दिशा सालियानने आत्महत्या केली नव्हती. दिशाचा शवविच्छेदनाचा अहवाल का आला नाही. सुशांतसिंहचीदेखील हत्या झाली. मर्डर केस कधीही संपत नाही. योग्यवेळी पुरावे देईन. आमच्या शेपटावर पाय दिला तर आम्ही गप्प बसणारे नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बलात्कार करायचे, ठार मारायचे. हे काय चाललंय. तरुण कलाकाराची हत्या कोणी केली. पुरावे कोणी नष्ट केले याची चौकशी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. सुडाचे राजकारण बंद करा. दुष्टपणा संपवा. लोककल्याणकारी राज्य निर्माण करा, असाही सल्ला त्यांनी दिला. मंत्रालयात, सभागृहात मुख्यमंत्री जात नसल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्या सोबत नितेश राणे उपस्थित होते.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. आमदार नितेश राणे यांनाही मारहाण प्रकरणी अटक झाली होती. आता त्यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाकडे शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. यावरुन राणे विरुद्ध शिवसेना असा सामना सुरु आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT