Latest

Nagpur : दृष्टीहीन मुलांनी दिला ‘स्वच्छ, सुंदर, स्वस्थ’ नागपूरचा संदेश 

सोनाली जाधव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : 'रामगिरी' या मुख्यमंत्री निवासापुढे रविवारी सकाळी फिरायला येणाऱ्यांना शहरातील विशेष मुलांनी एक सुखद धक्का दिला. स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी पुढाकार घेण्याचे फलक हातात घेतलेली ही दृष्टीहीन बालके नागरिकांना स्वच्छतेप्रती जागरूक करीत होती. निमित्त होते नागपूर महानगरपालिका, ज्ञान ज्योती अंध विद्यालय, राष्ट्रीय दृष्टिहीन पुनर्वसन संस्था आणि नागपूर @2025 यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस' या अभिनव उपक्रमाचे. वाचा सविस्तर बातमी. (Nagpur )

Nagpur : 'वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस'  

मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृणन बी., नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांच्यासह सर्व सहयोगी संस्थांच्या प्रतिनिधींनी रॅलीमध्ये सहभागी दृष्टीहीन बालकांना प्रोत्साहित केले. सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. लहान मुलांनी स्केटिंगच्या माध्यमातून, मनपा शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी  रॅलीमधून स्वच्छतेचा संदेश दिला. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने 'वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस' हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रज्ञाचक्षु दीपक बोडखे, प्रीती शिंदे आणि इतर मुलांनी स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी पुढाकार घेण्याचा संदेश दिला.

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे प्रमुख कौस्तभ चॅटर्जी यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी स्वच्छता संदेश देऊन नागरिकांना जागृत केले आहे. आता ते स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत आणि आपल्या पालकांना ते स्वच्छतेबाबत आग्रह करतील. त्यांच्या सोबत मेहुल कौसुरकर उपस्थित होते. सेव्हिंग ड्रीमझ फाउंडेशन आणि रोहित देशपांडे स्केटींग अकादमी यांच्या सहकार्याने स्केटींग रॅली काढण्यात आली. मनपाच्या गरीब नवाज नगर, वाल्मिकी नगर, नवी शुक्रवारी, पन्नालाल देवडिया, कळमना, दत्तात्रय नगर, संजय नगर आणि कपिलनगर शाळेतील दिव्यांग  विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले.

या उपक्रमाला राष्ट्रीय दृष्टिहीन पुनर्वसन संस्था, नागलवाडी, नागपूरचे अध्यक्ष भाऊ दायदार, नागपूर@2025 चे संयोजक निमिष सूतारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे, प्रवीण सिंग, सुभाष ठाकरे यांच्यासह, ज्ञान ज्योती अंध विद्यालयाच्या श्रीमती रंजना जोशी, नागपूर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सुभाष उपासे, राजेंद्र सुके, संजय दिघोरे, सर्व शाळा निरिक्षक, मनपा शिक्षक व धरमपेठ झोनचे स्वच्छता अधिकारी दीनदयाल टेंभेकर आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT