चिंचवड विधानसभा मतदारसंघ : पोटनिवडणूक प्रतिष्ठेची; पोलिसांची ‘परीक्षा’! | पुढारी

चिंचवड विधानसभा मतदारसंघ : पोटनिवडणूक प्रतिष्ठेची; पोलिसांची ‘परीक्षा’!

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी आज रविवारी (दि. 26) मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक अतिशय चुरशीची व प्रतिष्ठेची बनल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिस तयारीत मतदानप्रक्रिया भयमुक्त, निःपक्षपाती व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिस सर्वोतोपरी तयारीत आहेत.

निवडणुकीसाठी 4 पोलिस उपआयुक्त, 7 सहायक पोलिस आयुक्त, 19, पोलिस निरीक्षक, 108 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 1084 पोलिस अंमलदार, 297 होमगार्ड, 20 केंद्रीय औद्योगिक दल, 90 इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, 60 केंद्रीय राखीव पोलिस दल, 180 रेल्वे पोलिस असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले मारहाण प्रकरणानंतर वातावरण चिघळले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाकड येथील रॅलीदरम्यान भाजपच्या पदाधिकार्‍यांनी ठाकरे गटाचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांना मारहाण केली. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये भोसलेदेखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

मतदारांना पैशाचे आमिष
प्रभावित क्षेत्रामधील मतदारांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते धडपड करीत असतात. अशावेळी मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी वाहने आणि कार्यकर्त्यांची कसून तपासणी करणे गरजेचे आहे.

सोशल वॉरमुळे भावना भडकण्याची शक्यता
शहरप्रमुख भोसले मारहाण प्रकरणानंतर महाविकास आघाडी आणि भाजपच्या समर्थकांमध्ये एक प्रकारे सोशल वॉर सुरू असल्याचे दिसून येते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. भोसले यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स व जोक तयार करून व्हायरल केले जात असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान होणार आहे. सकाळी 6 ला ईव्हीएम मशिनची चाचणी म्हणजे मॉक ड्रील होणार आहे. त्यानंतर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत नागरिकांना मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणुकीचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना आदींसह इतर अधिकृत ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे आवश्यक आहे.

एका केंद्रावर 1,100 मतदार
मतदाररसंघातील महापालिका व खासगी शाळांच्या एकूण 87 इमारतींमध्ये एकूण 510 मतदान केंद्र आहेत. एका शाळेत 5 ते 10 केंद्र आहेत. एका केंद्रावर साधारण 1 हजार 100 मतदारांची यादी जोडण्यात आली आहे. त्या मतदारांना तेथील केंद्रांवर मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रापासून 100 ते 200 मीटर अंतरावर वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मतदारसंघातील भाग
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, विशालनगर, कावेरीनगर, पोलिस लाइन, काळेवाडी, थेरगाव, डांगे चौक, वाकड, भूमकर वस्ती, कस्पटे वस्ती, काळा खडक, चिंचवड, चिंचवडगाव, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, दळवीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी, रावेत, विकासनगर या भागांचा समावेश आहे.

एकूण मतदार 5 लाख 68 हजार 954

पुरुष 3 लाख 2 हजार 946
महिला 2 लाख 65 हजार 974
तृतीयपंथी 34
दिव्यांग 12 हजार 313
80 वर्षांवरील वयोवृद्ध 9 हजार 926
अनिवासी भारतीय 331

Back to top button