Latest

MS Swaminathan Death : १९६४ मध्ये स्वामीनाथन यांनी ‘या’ गावातून केली होती हरितक्रांतीची सुरुवात

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील 'हरितक्रांतीचे' (Green Revolution) जनक म्हणून ओळखले जाणारे कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan Death) यांचे गुरुवारी चेन्नईत निधन झाले. भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी बनवण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. वायव्य दिल्लीतील जौंती गावातील शेतकरीही स्वामीनाथन यांनी आणलेल्या 'हरितक्रांती'ची आठवण करत आहेत. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर वसलेले जौंती (Jaunti) हे तेच गाव आहे जिथे १९६४ मध्ये सुमारे ७० एकर जमिनीवर गव्हाच्या उच्च-उत्पादक वाणांची पेरणी करण्यात आली होती. या गावातूनच गहू उत्पादनातील क्रांती आणि हरितक्रांतीची ताकद देशाने आणि जगाने पाहिली.

संबंधित बातम्या : 

जौंती (Jaunti) गावातील शेतकरी स्वामिनाथन यांची आठवणी सांगत आहेत. हुकुम सिंग छिकारा, या शेतकऱ्याच्या जमिनीवर पहिल्यांदा गव्हाची पेरणी करण्यात आली होती. स्वामिनाथन यांच्या मृत्यूनंतर ते म्हणाले की, "ते एक सज्जन आणि कष्टाळू मनुष्य होते. त्यांनी आमच्यासाठी आणि जगासाठी चांगले काम केले." 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तसंस्थेशी बोलताना ९३ वर्षीय राममेहर सिंग, ज्यांचे वडील चौधरी भूप सिंग हे देखील हरित क्रांतीच्यावेळी पेरणी करणार्‍या जौंतीमधील पहिल्या शेतकर्‍यांपैकी एक होते, ते म्हणाले, "हरितक्रांती सुरू करण्यासाठी स्वामीनाथन यांनी आमचे गाव निवडले होते. तेव्हा इतर ठिकाणचे शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी येत असत आणि विक्री देखील भरपूर होत होती.

स्वामीनाथन यांच्या सूचनेनुसार १९६५ मध्ये जौंती येथे जवाहर जौंती बियाणे सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. त्यातील शेतकऱ्यांनी गव्हाचे बियाणे भरपूर विकले होते. राधा सिंह या शेतकऱ्यांनी सांगितले की, "१९६७ मध्ये सहकारी संस्थेच्या बीज-प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी स्वामिनाथन यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गावात आमंत्रित केले होते. ही देखील अभिमानाची गोष्ट आहे. स्वामीनाथन दरवर्षी गावाला भेट देत असत. बीज-प्रक्रिया केंद्र आता दिल्ली सरकारचा दवाखाना बनला आहे, ज्याचा इतिहास दर्शवणारा बोर्ड लुप्त होत आहे.

सुमारे १४ एकर जमीन असलेले शेतकरी आर्य कुलदीप जे ६० वर्षांचे आहेत ते म्हणाले की, "आमचे गाव डॉ. स्वामिनाथन यांच्यामुळे ओळखले जाते. इथून 'हरितक्रांती' सुरू झाली आणि त्यांचे कार्य आजही माझ्या पिढीतील आणि मोठ्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे.

जौंती गावात हरितक्रांती सुरू झाली त्यावेळी शेतांना सिंचनासाठी कालव्यातून पाणी उपलब्ध होते. परिसर अतिशय सुपीक होता. आता त्या कालव्याने पाणी आणणे बंद केल्याने येथील भूजल पातळीही खालावली आहे. येथील लोक आता आपले लक्ष शेतीपासून हटवून नोकरीकडे वळू लागले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT