Karnataka Bandh : कावेरी पाणीप्रश्नी आज कर्नाटक बंद; राज्यभरातील शेतकरी संघटना आक्रमक | पुढारी

Karnataka Bandh : कावेरी पाणीप्रश्नी आज कर्नाटक बंद; राज्यभरातील शेतकरी संघटना आक्रमक

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : कावेरीतून तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून (Cauvery water issue) राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज (दि.२९) कर्नाटक बंदची (Karnataka Bandh) हाक देण्यात आली आहे. दरम्यान, बेंगळुरू पोलिसांनी कावेरी पाणी प्रश्नावर निषेध करणाऱ्या कन्नड समर्थक संघटनांच्या सदस्यांना अटीबेलेजवळ ताब्यात घेतले आहे.

तामिळनाडूला पाणी सोडण्यास विरोध करत शेतकरी संघटनांकडून मंगळवारी बंगळूर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे. यासाठी आज बंद (Karnataka Bandh) पुकारण्यात आला आहे. कावेरी पाणी नियंत्रण प्राधिकरणाने कावेरीतून तामिळनाडूला रोज ५ हजार क्यूसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मंगळवारी कावेरी पाणी नियंत्रण समितीने २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत रोज ३ हजार क्यूसेक पाणी तामिळनाडूला सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने हाती घेण्यात आली आहेत. राज्यभरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. अनेक धरणे कोरडी आहेत. यामुळे कावेरीतून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांतून विरोध करण्यात येत आहे.

कन्नड समर्थक संघटनांच्या सदस्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कावेरी पाण्याच्या प्रश्नावर विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे बेंगळुरूच्या विजयनगर मेट्रो स्टेशनवर आज सकाळी प्रवाशांची संख्या कमी दिसली. मंड्याजवळ कावेरी पाण्यात उभे राहून कन्नड समर्थक संघटनांनी आंदोलन केले. बेंगळुरू पोलिसांनी कावेरी पाणी प्रश्नावर निषेध करणाऱ्या कन्नड समर्थक संघटनांच्या सदस्यांना अटीबेलेजवळ ताब्यात घेतले आहे. बंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांनी सांगितले की, “कन्नड समर्थक संघटनांनी बंद पुकारल्याने आम्ही योग्य ती व्यवस्था केली आहे. संघटनांतील ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षेसाठी आमच्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत त्यामुळे काहीही चूकीच घडू देणार नाही.”

Back to top button