पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पुणे-दिघी बंदर या महामार्गावरून जाणार्या एसटी महामंडळाच्या बहुतांश बस या प्रचंड धूर सोडून प्रदूषण करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रदूषण करणार्या बस आमच्या तालुक्यात पाठवू नका, अशी मागणी मुळशीकर नागरिकांनी केली आहे. एखाद्या खासगी वाहनातून धूर निघू लागला तर वाहतूक पोलिस लगेचच वाहनास थांबवून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (पीयूसी) मागणी करतात. पीयूसी नसेल, तर त्या वाहनावर दंड ठोठावला जातो. परंतु शासकीय वाहनांवर अशी कारवाईचे प्रमाण नगण्य दिसून येते. अशा वाहनांनाही वाहतूक पोलिसांनी थांबवून कारवाई करणे अपेक्षित आहे, असे पुणे-दिघी बंदर या महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थ सांगत आहेत.
संबंधित बातम्या :
कारण या महामार्गावरून जाणार्या एसटी महामंडळाच्या बहुतांश बस या प्रचंड धूर सोडून प्रदूषण करताना दिसत आहेत. एकीकडे शासन प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक तसेच सीएनजीवर धावणार्या वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे एसटी महामंडळाची ही अशी अवस्था आहे. अनेक एसटी बस असूनदेखील त्या धूर सोडून प्रदूषण करत आहेत. या बसेस भूगाव, भुकूम, पिरंगुट, घोटवडे फाटा, पौड, माले, मुळशीमार्गे जाणार्या अनेक बसमधून प्रदूषण होताना दिसत आहे. अनेकदा स्थानकावर बस थांबल्यानंतर बंद केली जाते. त्यानंतर ती चालू केली असता प्रचंड मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर निघतो. पुढे धावत्या बसमधूनही धूर बाहेर पडत असतो. त्याचा स्थानिक नागरिकांना तसेच जवळून जाणार्या वाहनातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. हा धूर आरोग्यासाठी हानिकारक असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एकीकडे प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वत्र प्रचार, प्रसार करायचा आणि दुसरीकडे शासकीय वाहनेच प्रचंड प्रदूषण करत आहेत. त्यामुळे प्रदूषण करणार्या बस बंद कराव्यात किंवा त्यांची दुरुस्ती करावी किंवा मुळशी तालुक्यातून त्यांना पाठवू नये, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.