पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील 'केबल ब्रिज' रविवारी सायंकाळी 6.30 वाजता अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 60 जण मरण पावले. मृतांमध्ये 10 मुलांचा समावेश आहे. मोरबीचे माजी आमदार कांती अमृतिया यांनी, माझ्यासमोर 60 मृतदेह नदीबाहेर काढण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले. जखमींसाठी राजकोट जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. (Morbi Bridge Accident)
पूल तुटताच पुलावरील बहुतांश जण नदीत पडले. दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 500 पेक्षा जास्त लोक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने मोरबीत एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तसेच प्रशासनाने तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. शक्य तितक्या लोकांना नदीतून बाहेर काढले. पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती व तो पूर्ववत सुरू करण्यात आला होता. तत्पूर्वी, 6 महिने तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. (Morbi Bridge Accident)
बुडालेल्यांचा तसेच वाहून गेलेल्यांचा अधिकृत आकडा अजून समोर यायचा आहे. प्रशासनाने 7 जण मरण पावल्याचे म्हटले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तविली आहे. अपघात घडला तेव्हा पुलावर 500 वर लोक होते, हे मात्र खात्रीने सांगितले जात आहे. पूल तुटल्यानंतर अनेक लोक मधोमध अडकलेले होते. तुटलेला पूल पकडून अनेकांनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. अत्यंत जुना असलेला हा पूल दुरुस्तीनंतर पाच दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला होता. दुरुस्तीनंतरही एवढी मोठी दुर्घटना घडल्याने कंत्राटदाराच्या कामावर सवाल उपस्थित केले जात आहेत. पुलाच्या दुरुस्तीवर 2 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. (Morbi Bridge Accident)
मोरबीचे तत्कालीन राजे प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर हे राजमहालातून दरबारापर्यंत या पुलाने जात असत. त्यांच्या काळातच पुलाची निर्मिती झाली. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर मोरबी नगरपालिकेवर या पुलाची जबाबदारी सोपविण्यात आली. लाकूड आणि तारेने बनविण्यात आलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. हा पूल एक पर्यटनस्थळ होते. त्यासाठी 15 रुपये तिकीट दरही आकारला जात असे. 1880 मध्ये 3 लाख 50 हजार रुपये खर्चून हा पूल बनविण्यात आला होता. पुलासाठीचे साहित्य तेव्हा ब्रिटनमधून मागविण्यात आले होते. (Morbi Bridge Accident)