चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरपना तालुक्यातील बिबी येथील समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या नामांकित पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हेमलकसा येथील जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमट यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेवार्थ सन्मान हा अर्चना मानलवार यांना घोषित करण्यात आला आहे. त्या चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेमार्फत अपंग कल्याणासाठी कार्यरत आहेत. (Award )
बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे अस्थिरुग्णांवर उपचार करतात. मागील ३५ वर्षे ते निशुल्क उपचार करत असून, पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्णांना त्यांनी बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना 'डॉक्टर' ही उपाधी दिली आहे. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप व प्राचार्य डॉ.अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (Award )
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सारख्या अतिदुर्गम, नक्षलप्रभावित भागात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य करतात. आदिम माडिया-गोंड समाजासाठी आरोग्य व शिक्षणाचे ते काम करीत आहेत. मागील पाच दशकांतील त्यांच्या लोकसेवेने जगात आदर्श निर्माण केला आहे. थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या सेवेचा वारसा त्यांची तिसरी पिढी चालवत असून, कल्याणकारी समाजनिर्मीतीचे आमटे कुटुंब दीपस्तंभ आहेत.
चंद्रपूरच्या समाजसेविका अर्चना मानलवार स्वत: ९०% अपंग आहेत. ज्ञानार्चना संस्थेच्या माध्यमातून अपंगाचे पुनर्वसन करतात. अपंग महिला-पुरुषांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनवण्याचे धडे देत सक्षम करण्याचे काम त्या निष्ठेने करत आहे.
२०१२ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते. यंदाचा दिव्यग्राम महोत्सव ७ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप, डॉ.अनिल मुसळे, डॉ. गिरीधर काळे, सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हेही वाचा