Latest

Mohammed Rafi : मोहम्मद रफींच्या ‘त्या’ गाण्यावर पं. नेहरूंच्या डोळ्यातून आले होते पाणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सोनिये नि हिरीये नि', हारों फूल बरसाओ', 'आज मौसम बडा बेईमान है,' 'तारीफ करूं क्या उसकी,' 'चाहूंगा मैं तुझे,' 'अभी ना जाओ छोडकर,' 'पद घुंगरू बांध…' असे एकापेक्षा एक गाणी गाणारे उत्तम गायक मोहम्मद रफी यांचा आज (२४ डिसेंबर) जन्मदिवस आहे. (Mohammed Rafi) साधारणपणे १९५० ते १९७९ पर्यंत मोहम्मद रफी यांनी पार्श्वसंगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले.  (Mohammed Rafi)

"काँच के टुकडे जवाहर नहीं बन सकते, चाहे बने कुछ 'रफी' नहीं बन सकते" या काव्‍यपंक्‍ती गायक मोहम्मद रफी यांची आजही आठवण करून देतात. आपल्‍या जादूई गायकीने संगीतप्रेमींच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणारे मोहम्‍मद रफी यांचा जन्‍म २४ डिसेंबर, १९२४ मध्‍ये अमृतसर (पंजाब) येथे झाला होता. रफी यांना त्‍यांच्‍या घरी 'फीको' नावाने हाक मारत असत. वयाच्या १३ व्या वर्षी एका मैफलीत कुंदनलाल सहगल यांच्यासोबत रफी यांना गाण्याची संधी मिळाली होती.

'आज मौसम बडा बेईमान है,' 'तारीफ करूं क्या उसकी,' 'चाहूंगा मैं तुझे,' 'अभी ना जाओ छोडकर,' 'पद घुंगरू बांध…' यासारख्‍या हिट हिंदी गाण्‍यांशिवाय प्रादेशिक भाषेतील त्‍याचबरोबर प्रादेशिक भाषेतील गाणी त्‍यांनी गायली.

मोहम्मद रफी यांनी पार्श्वगायन सुरू केले होते. 'गुलबलोच' या पंजाबी चित्रपटासाठी 'सोनिये नि हिरीये नि' हे गाणे (१९४४) त्यांनी गायले होते. श्यामसुंदर यांचे संगीत होते. 'गाँव की गोरी' या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी वेगळे गाणे गायले.

महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर हुस्नलाल भगतराम, राजेंद्रकृष्ण आणि मोहम्मद रफी यांनी मिळून 'सुनो सुनो दुनियावालो बापूजी की अमर कहानी' हे अविस्मरणीय गाण्याची निर्मिती केली होती.

अन्‌ नेहरूंचे डोळे आले भरून

असं म्हटलं जातं की, व्यासपीठावर मुहम्मद रफी यांचे गाणे 'चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे' ऐकल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरू यांचे डोळे भरून आले होते. असे म्हटले जाते की, नेहरुंनीदेखील रफी यांना एकदा आपल्या घरी मैफल करण्यासाठी आमंत्रित केले होते.

हिंदीशिवाय, आसामी, कोंकणी, भोजपुरी, ओडिया, पंजाबी, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तेलगू, माघी, मैथिली, उर्दू, इंग्लिश, फारसी, अरबी आणि डच भाषांमध्‍ये मोहम्मद रफी यांनी गाणी गायली.

प्रसिध्‍द गायक असण्‍याबरोबरच देखणे कलावंत म्‍हणून मोहम्‍मद रफी यांची ख्‍याती. सर्वांच्‍या मदतीला धावून जाणारे, विनम्र अशी त्‍यांची इंडस्‍ट्रीतील ओळख. अभिनेते पृथ्‍वीराज कपूर यांना एकदा एका कार्यक्रमात विचारण्‍यात आले होते की, 'या फिल्‍म इंडस्‍ट्रीत खर्‍या अर्थाने चारित्र्यसंपन्‍न म्‍हणावे, अशी व्‍यक्‍ती कोण आहे?' पृथ्‍वीराज कपूर यांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले होते, 'मोहम्‍मद रफी.'

मोहम्‍मद रफी यांनी रोमँटिक गाणी, कव्‍वाली, गजल आणि भजनदेखील गायले. रफी यांना कुंदलाल सहगल यांनी एका लहान मुलाच्‍या डोक्‍यावर (रफी) यांच्‍या डोक्‍यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता आणि म्‍हणाले होते, 'एक दिवस तू आपले नाव उज्‍ज्‍वल करशील.' पुढे सहगल यांचा आशीर्वाद खरा ठरला. संगीतकार नौशाद यांनी रफी यांना कोरसमध्‍ये गाण्‍याची संधी दिली.

गाणी गाण्‍याआधी रफी यांचा अभ्‍यास असायचा. पार्श्वगायन करताना पडद्यावर ते गीत कोणाच्‍या तोंडी (अभिनेता) आहे, याचा अभ्‍यास ते करीत. त्‍यानंतरच, गाणे गायला घेत. त्‍यामुळेच, राज कपूर, दिलीप कुमार, जॉनीवॉकर, मुक्री, मेहमूदपर्यंत सर्वांच्‍या ओठांवर रफी यांचा आवाज समरस झाला. त्‍याचबरोबर, शम्‍मी कपूर, राजेंद्र कुमार यांच्‍या सिनेकिरअरमध्‍ये त्‍यांची गाणी रफी यांच्‍या गाण्‍याने बहरली. दर्दी रसिकांनाही त्‍यांची गाणी आवडायची.

रफी गायकी क्षेत्रात कसे आले, हे त्‍यांनी खुद्‍द एका एका मुलाखतीत सांगितले होते. बालपणी एका फकीरच्‍या आवाजाने मोहम्‍मद यांना प्रभावित केले होते. त्‍यामुळे ते गायनाच्‍या क्षेत्रात आले. 

एक किस्‍सा असाही…

संगीतकार ओ. पी. नय्‍यर यांनी रफी यांना गायनासाठी संधी दिली. परंतु, रफी यांची एका कारणामुळे ही संधी हुकली. रफी यांना ओ. पी. यांच्‍यासोबत एका गाण्‍याचे रेकॉर्डिंग करायचे होते. पण, रफी यांना यायला उशीर झाला होता. कडक शिस्‍त आणि वेळ पाळणार्‍या ओ. पी. यांनी रफी यांना कारण विचारले. त्‍यावेळी प्रामाणिकपणे उत्तर दिले. त्‍यानंतर, ओ. पी. यांचा रागाचा पारा चढला. त्‍यांनी गाण्‍याचे रेकॉर्डिंग रद्‍द केले. त्‍याचबरोबर, रफी यांना आपल्‍या संगीतात घ्‍यायचे नाही, असे ठरवले. त्‍यामुळे रफी यांची ओ. पी. यांच्‍यासोबत गाण्‍याची संधी हुकली.

ओ. पी. नय्‍यर आणि रफी पुन्‍हा एकत्र आले

पुढे कित्येक वर्षांनी देवू मुखर्जी यांच्‍या 'ऐसा भी होता है' या चित्रपटाच्‍या वेळी रफी ओ. पी. यांना भेटले. झाल्‍या प्रकाराची दिलगिरी व्‍यक्‍त केली. रफी म्‍हणाले, 'आपल्‍या संगीतापासून वंचित राहण्‍याचा विरह आता मला सहन होत नाही.' रफी यांचे हे उद्‍गार ऐकून ओ. पी. भावूक झाले आणि त्‍यांनी रफी यांना आलिंगन दिले.

खासगी आयुष्य

असे म्‍हटले जाते की, रफी यांनी दोन विवाह केले. त्‍यांनी आपला पहिला विवाह सर्वांपासून लपवून ठेवला होता. या लग्‍नाबद्‍दल फक्‍त त्‍यांच्‍या घरच्‍या मंडळींना माहीत होते. मोहम्‍मद रफी यांचे ३१ जुलै, १९८० रोजी निधन झाले.

अधिक वाचा- 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT