

आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुगंधी वनस्पतींचे (Aromatic plant) उत्पादन होत असून त्याला देशांतर्गत आणि परदेशातही चांगली मागणी आहे. पण, वाढत्या मागणीच्या आधारे त्याचे निर्यातमूल्य घटत असून त्यामध्ये वाढ होण्यासाठी अधिकाधिक शेतकर्यांनी सुगंधी वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे.
सुगंधी वनस्पतींची (Aromatic plant) शेती आपल्या देशासाठी आता नवी राहिलेली नाही. अनेक राज्यांनी या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तामिळनाडू, कर्नाटकात जिरॅनियम, उत्तर प्रदेेशात वाळा, पंजाबमध्ये पुदिना, केरळ राज्यात गवती चहा, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेशात सिट्रोनेला, उत्तर प्रदेश-कर्नाटकात रोेशा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये दवणा तर पश्चिमघाट प्रदेशात पाचौली या सुगंधी वनस्पतींची शेती वाढीस लागली आहे. या वनस्पतींपासून सुगंधी तेलांचे उत्पादन होते.
सुगंधी तेलांना (Aromatic plant) देशांतर्गत तसेच निर्यातद़ृष्ट्या मोठी मागणी असून या तेलांच्या विघटनातून तयार केल्या जाणार्या उत्पादनांच्या निर्मिती, व्यापार आणि निर्यातीत 450 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. आज सुगंधी तेलाचे जागतिक उत्पादन सव्वा लाख टन असून (मूल्य 30000 कोटी रुपये) आपल्या देशात या निर्यातीपासून मिळणारे मूल्य केवळ 9000 लाख रुपये आहे. सुगंधी तेलाची काही वर्षांची मागणी पाहता निर्यातमूल्य घटत असून निर्यातीत वाढ होणे आवश्यक आहे. कारण, या तेलांची देशांतर्गत मागणी 9 टक्के दराने तर निर्यातीमधील मागणी 25 टक्क्यांनी वाढत आहे. या क्षेत्रातील भारताचा वाटा 16 टक्के असून अमेरिका, कॅनडा, युरोपीय संघ इत्यादी देेशांत निर्यातीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. कारण, या देशांमध्ये जागतिक उत्पादनांच्या 70 टक्के सुगंधी तेल वापरले जाते.
अत्तरे, साबण, डास-कीटक प्रतिबंधक रसायने, केशतेल, वनस्पतीजन्य सौंदर्यप्रसाधने, गंधचिकित्सा इत्यादी उद्योगांमध्ये सुगंधी तेलाची मागणी वाढत आहे. आपल्या देशात 60 टक्के सुगंधी तेलाचा वापर सुगंधी द्रव्ये (Aromatic plant) आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. तसेच 20 टक्के खाद्यपदार्थांना स्वाद देण्यासाठी ते वापरले जाते. आपल्या राज्यात जिरॅनियम, पुदीना, क्लॉसिमम, पाचौली, गवती चहा, सिट्रोनेला, रोशा, कस्तुरभेेंडी, दवणा, वाळा या सुगंधी वनस्पतींची शेती व्यापारीद़ृष्ट्या करता येऊ शकते, असे शेती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
– अनिल विद्याधर
हेही वाचा :