सातारा : आणखी एका डॉक्टरला घातला 40 लाखांचा गंडा | पुढारी

सातारा : आणखी एका डॉक्टरला घातला 40 लाखांचा गंडा

सातारा : मला फॉरेन फंडातून भरपूर पैसे मिळणार आहेत. तुम्हाला 100 कोटींचे कर्ज कमी व्याजदरात देतो, असे सांगून वेळोवेळी 40 लाख रुपये घेऊन संदीप बाळू घोरपडे (रा. टाकेवाडी, ता. माण) याने सातार्‍यातील एका डॉक्टरला गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 15 दिवसांतील अशी दुसरा घटना असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाआहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार डॉक्टर हे सातार्‍यातील असून संशयित एकमेकांचे ओळखीचे आहेत. 2016 साली तक्रारदार यांना पैशांची गरज असल्याने संशयिताने ही बाब हेरली. त्यावरुन संशयिताने आपणास दीड हजार कोटी रुपयांचा फॉरेन फंड मिळणार असल्याचे सांगितले. यावरुन तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी संशयिताने 2016 ते 2021 या कालावधीत तब्बल 40 लाख रुपये घेतले.

तक्रारदार यांना 100 कोटी लवकर मिळतील, अशी आशा लागली असताना संशयिताने नंतर तक्रारदार यांची टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फॉरेन फंड येत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी 40 लाख रुपये परत मागण्याचा तगादा लावला. मात्र पैसे न देता उलट संशयित आरोपीने तक्रारदार डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Back to top button