राहुरी : अन्न, आरोग्यसेवा ही देशाची बलस्थाने : अर्थतज्ज्ञ अनिल बोकील | पुढारी

राहुरी : अन्न, आरोग्यसेवा ही देशाची बलस्थाने : अर्थतज्ज्ञ अनिल बोकील

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  पूर्वी देशात बारा बलुतेदार पद्धत होती. त्यावेळी देश सुजलाम्- सुफलाम् होता. व्यवहारात वस्तुंच्या व सेवेच्या बदल्यात धान्य दिले जायचे. आता व्यवहार नोटांमध्ये होतात, त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आहे, असे सांगत चायनाने व्हायरस दिला, त्यावर आपण व्हॅक्सीन दिली, असे सांगत नैसर्गिक संपत्तीमुळे अन्न, आरोग्यसेवा ही आपल्या देशाची बलस्थाने झाली आहेत. या जोरावर आपण भविष्यात जगावर राज्य करणार आहोत, असे प्रतिपादन पुणे येथील थिंक टँक अर्थक्रांंतीचे संस्थापक अनिल बोकील यांनी केले.
म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांतून ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022’ कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोकील बोलत होते. अध्यक्षस्थानी म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते.

यावेळी नवी दिल्ली येथील भाकृअप, कास्ट-नाहेपच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल, नाबार्डचे महा व्यवस्थापक सुब्रत कुमार नंदा, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुल सचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. जयप्रकाश गायकवाड व संयोजन सचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
आपला देश जैवविविधतेने फार समृद्ध आहे. त्यामुळे अन्न-धान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊन आपण जगाला अन्न-धान्य पुरवत आहोत. बदलत्या हवामान व औद्योगीक क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे बाहेरच्या देशांचे आरोग्य व अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, शेतीमुळेच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे, हे लॉकडाऊनच्या काळात अधोरेखीत झाले. आता शेती व शेती शिक्षणाला महत्व प्राप्त होत आहे, असे सांगत केंद्र व राज्य शासनाने बनविलेल्या शेती विषयक योजना प्रगतीकडे नेणार्‍या आहेत.  डॉ. अनुराधा अग्रवाल म्हणाल्या, भारताची अर्थव्यवस्था कृषिवर अवलंबुन आहे. यामुळे आता प्राथमिक शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. सुब्रत कुमार नंदा म्हणाले, भारत देश अन्न-धान्यामध्ये स्वयंःपूर्ण झाला आहे. या अन्न-धान्यातून अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी मुल्यवर्धनाची जोड देणे आवश्यक आहे.

प्रास्ताविक डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. डॉ. सुनिल गोरंटीवार ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स’बाबत म्हणाले, रोजगार मेळाव्यामध्ये 75 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. शिक्षण व संशोधनासाठी राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. शेतीमधील ड्रोन पायलट ट्रेनिंग संदर्भात शेतकरी व तरुणांमध्ये जनजागृती झाली. एमपीकेव्ही क्लायमेक्सचा रोजगार, शिक्षण मेळावा आदी आढावा डॉ. मुकुंद शिंदे यांनी सादर केला. आभार डॉ. रवी आंधळे तर सूत्रसंचालन सायली बिरादार हिने केले.

देशाची कृषीशिवाय प्रगती नाही, ही जाणीव धरून शालेय विद्यार्थ्यांनी कृषी विषयामध्ये आवड निर्माण करावी. आंतराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पध्दतीच्या धोरणानुसार देशातील शिक्षणामध्ये 40 टक्के ऑनलाईन व 60 टक्के ऑफलाईन शिक्षण असण्यासंबंधीचे धोरण तयार करण्यात येत आहे.
      -डॉ. अनुराधा अग्रवाल, भाकृअप, कास्ट-नाहेप, नवी दिल्ली राष्ट्रीय समन्वयक

Back to top button