सातारा ; पुढारी ऑनलाईन : सातारा नगरपालिकेल्या निवडणुकीची रणधुमाळी सूरू आहे. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील कलगीतुरा आणखी रंगतदार बनत चालला आहे. दोन्ही राजेंनी सातारा शहरातील विकास कामांचा धुमधडाका लावला आहे. विकासकामांच्या कार्यक्रमातून दोन्ही राजेंनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. शुक्रवारी (दि.२४) खासदार उदयनराजे यांनी काय बाई सांगू कसं गं सांगू या गाण्याचे बोल गात शिवेंद्रराजेंवर उपहासात्मक टीका केली. (udyanraje vs shivendraraje)
शुक्रवारी नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उदयराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेसाठी, या असे आवाहन केले मात्र त्याचवेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला. काय बाई सांगू? कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी मला झालंय आज", अशा ओळी म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला हाेता. तेव्हा सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
काय बाई सांगू वगैरे गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नक्की लाज कशाची वाटते हे सातारकरांना कळू दे. नेहमीच्या टॅकटीक्स झाल्यात या. दहा मिनिटं रडायचं आणि जाता पप्पी घ्यायची हे नेहमीचं झालं आहे. या सर्व मुद्द्यावरुन टीका होऊ लागलीय. तुम्ही कामांचं बोला. पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिली. तुम्ही भ्रष्टाचारमुक्त पालिका करणार होता मात्र हे कुठं गेलं?," असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना उपस्थित केला. उदयनराजेंची ही चाल मला माहीत आहे गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं हे जे प्रेम आहे ते मनापासून नाहीय. हे मतांपुरतंचं प्रेम आहे. हे प्रेम सातारकरांनी ओळखलं पाहिजे, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
सातारा शहरात सध्या 'नारळफोड्या गँग' फिरत आहे, अशी बोचरी टीका शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांचं नाव न घेता केली होती. या टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय. 'आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलंय,' असा पलटवार उदयनराजेंनी केला आहे.
'जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले. मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केलीत.अशा पद्धतीनं लोकांची घर फोडण्यापेक्षा नारळ फोडून विकासकामं करणारी आमची गँग चांगली, असा टोला उदयनराजेंनी हाणला आहे.
'वय वाढल्यामुळं शिवेंद्रराजेंची बुद्धीसुद्धा लहान मुलाच्या बुद्धीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळंच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला आहे. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे मला पटत नाही. हे लोक अत्यंत संकुचित वृत्तीचे आहेत. त्यांनी आरोप करताना विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
लोकांची आमच्याकडूनच कामांची अपेक्षा आहे. त्यामुळंच आम्ही कामांचे नारळ फोडतोय, असंही उदयनराजे म्हणाले. राजकारणात हेल्दी कम्पिटिशन पाहिजे, ती त्यांनी जरूर करावी; पण असे आरोप करताना थोडं भान ठेवलं पाहीजे, असंही त्यांनी शिवेंद्रराजेंना सुनावलं. सातारा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवेंद्रराजे अटोकाट प्रयत्न करत आहेत. उदयनराजेंनीही नगरपालिकेच्या कामांच्या माध्यमातून लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवून पुन्हा जनतेचा कौल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात कोणाची सरशी होते याविषयी उत्सुकता आहे.
हेही वाचलं का?