कुपवाड : पुढारी वृत्तसेवा : कुपवाड, बुधगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एमआयडीसीतील एका प्रेमी कामगार युगलाने प्रथम किटकनाशक प्राशन केले. त्यानंतर दोघांनी शेडमधील छताच्या लोखंडी अँगलला एकाच साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.२५) शनिवारी सकाळी उघडकीस आली. (Kupwad MIDC)
राजू महादेव माळी (वय ३६, सध्या राहणार कुपवाड) व रीना किरण पार्लेकर (वय ३३, राहणार मिरज) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: मयत राजू माळी हा बुधगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात भाड्याने कुटुंबांसह राहतो. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.
पत्नीने त्याला सोडून मुलाला सोबत घेऊन माहेरी (कर्नाटक) गेल्या एक वर्षापूर्वी गेली आहे. तो कुपवाड एमआयडीसीतील एका गारमेंटमध्ये बसचालक म्हणून नोकरी करीत होता. तर त्याच गारमेंटमध्ये रीना पार्लेकर ही महिला नोकरी करीत होती.
दरम्यान, याच कालावधीत या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. गेली काही महिने झाले रीना काम संपल्यावर ती नेहमी राजू याच्या घरी ये जा करीत होती.
नेहमीप्रमाणे काम संपल्यावर शुक्रवारी सायंकाळी हे प्रेमी युगुल माळी याच्या घरी आले. त्यानंतर ते दोघे शेजारील एका शेतकऱ्याच्या मळ्यात गेले. त्याठिकाणी पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून दोघेजण शुक्रवारी रात्री आत गेले. दाराला आतून कडी लावून घेतली. त्यानंतर दोघांनी कोणतेतरी किटकनाशक प्राशन केले.
त्यानंतर खोलीतील साडी घेऊन दोघांनी छताच्या लोखंडी अँगलला गळफास लावून दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केली.शनिवारी सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे गाई, म्हशीचे दूध काढण्यासाठी आला होता.
यावेळी शेडचे कुलूप तोडलेले दिसले. तर शेडच्या दरवाजाला आतून कडी असलेचे त्यांना आढळून आले. त्याने शेडच्या खिडकीचा पत्रा उचकटून आत बघितले असता राजू माळी याच्यासह एक महिला अशा दोघांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती शेतकऱ्याने कुपवाड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती रीना हिच्या मुलाला व नवऱ्याला समजली. दोघे तातडीने घटनास्थळी पोचले. मुलाने दरवाजा तोडून त्या दोघांना खाली घेतले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आत्महत्या विष प्राशन करून घेतली की गळफास लावून केली याचा उलगडा होईल. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.