सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील लोणंद, खंडाळा, पाटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या नगरपंचयातींच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मंगळवार, दि. 21 रोजी नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सहा नगरपंचायतींसाठी 113 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नगरपंचायतींसाठी 266 उमेदवार रिंगणात असून आज या उमेदवारांचे नशीब पेटीबंद होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यक्षेत्रात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दि. 8 डिसेंबरपासून नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज छाननी व माघारीच्या प्रक्रियेनंतर 266 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने 24 प्रभागांतील जागा खुल्या झाल्या असून यांचा निवडणूक कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत 17 पैकी 13 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांच्या होम टू होम घरभेटींचे सत्र सुरू झाले.
लोणंदमध्ये 21 केंद्रांवर मतदान
लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 55 उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील 13 हजार 314 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 21 केंद्रावर मतदान होणार आहे. या प्रक्रियेवर प्रांताधिकारी शिवाजी जगताप व मुख्याधिकारी हेमंत ढोकले हे लक्ष ठेवून आले आहेत.
लोणंद नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेस, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होत आहेत. 9 अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाची सर्व तयारी झाली असून मतदानासाठी 150 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 100 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकार्यांकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दहिवडीमध्ये 39 जण रिंगणात
दहिवडी नगरपंचायतीसाठी 13 प्रभागात 20 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. नगरपंचायतीसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणात आहेत. 9,926 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पाटणमध्ये 13 केंद्रांवर होणार चुरस
पाटण नगरपंचायतीसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व जिल्हा बँक संचालक सत्यजित पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. 13 जागांसाठी 13 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहे. 41 उमेदवार रिंगणात असून आज त्यांचे नशीब पेटीबंद होणार आहे. मतदान सुरळीत व्हावे यासाठी तीन झोनल अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 अधिकारी, 1 शिपाई व 1 पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे.
वडूजमध्ये 20 केंद्रावर मतदान
वडूज नगरपंचायतीसाठी सर्वाधिक 58 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. नगरपंचायतीसाठी 20 मतदान केंद्रे असून या ठिकाणी 11 हजार 271 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 120 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलिस फौजदार, 50 पोलिस कर्मचारी, 90 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरेगावात 15,360 जण करणार मतदान
कोरेगाव नगरपंचायतीसाठी 26 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 13 प्रभागांमध्ये 15 हजार 360 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर एकूण 26 केंद्राध्यक्ष, 78 मतदान अधिकारी, 26 पोलीस जवान, 26 शिपाई नेमण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि अर्चना शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलिस जवान, होमगार्ड यांनी कोरेगाव शहरात संचलन केले.
खंडाळ्यात 41 उमेदवार रिंगणात
खंडाळा नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील 3,815 जण आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी 13 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 65 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोनि महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.