Latest

एकच फोन कॉल अन् मागणी मंजूर ! केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराडांच्या आश्वासनाने आशा पल्लवित

अमृता चौगुले

मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील व्यापारी संमेलनात व्यापार्‍यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना मिरजगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली. आमदार शिंदे यांनी तेथूनच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना फोन केला अन् मंत्री कराड यांनी फोनवर मिरजगाव येथे बँकेची शाखा मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मिरजगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने 9 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियाना निमित्त मिरजगाव येथे व्यापारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापार्‍यांनी विविध समस्या आमदार शिंदे यांच्यासमोर मांडल्या.

कर्जत तालुक्यातील अहमदनगर -सोलापूर हायवेवर असणारे मिरजगाव हे व्यापारी दृष्टीने मोठे गाव आहे. सध्या गावात राष्ट्रीयीकृत बँकेची एक शाखा आहे. मात्र, व्यापार्‍यांचे व्यवहार जास्त असल्याने या ठिकाणी आणखी एका बँकेची आवश्यकता असल्याची मागणी व्यापार्‍यांनी केली. यावर आमदार शिंदे यांनी बैठकीतूनच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना फोन स्पिकर ऑन करून राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा मंजूर करण्याची विनंती केली.

त्यावर डॉ. कराड यांनी तुम्ही मागणी अर्ज पाठवा, नंतर सर्व्हे टीम येऊन पाहणी करील आणि लगेच शाखा मंजूर होईल व बँकेच्या उद्घाटनाला मी स्वतः येईल असे सांगितले. व्यापार्‍यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच, केंद्र सरकारने जनतेसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

व्यापारी संमेलनास डॉ.रमेश झरकर, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, अशोक खेडकर, प्रवीण घुले, सरपंच नितीन खेतमाळस, संपत बावडकर, काका धांडे, शिवाजी नवले, डॉ.पंढरीनाथ गोरे, व्यापारी बापूसाहेब कासवा, पप्पू कोठारी, सारंग घोडेस्वार, मुन्ना भंडारी, दादा बुद्धिवंत, सलिम आतार, सागर पवळ, आनंद पाचपुते आदींसह शहरातील व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT