‘मी शाहू बोलतोय’ नाट्यप्रसंगातून शाहूंच्या विचारांना उजाळा | पुढारी

‘मी शाहू बोलतोय’ नाट्यप्रसंगातून शाहूंच्या विचारांना उजाळा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण, पाणी टंचाई दूर करण्यासाठी बांधलेले राधानगरी धरण, कुस्ती, खेळांना प्रोत्साहन यासह समाज सुधारण्यासाठी त्या काळात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले अफाट कार्य आजही समाजाने समाजावून घेण्याची गरज आहे, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी ‘मी शाहू बोलतोय’ या नाट्यप्रसंगातून शाहूंच्या विचारांना उजाळा दिला.

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त रविवारी या नाटकाचे केशवराव भोसले नाट्यगृहात सादरीकरण झाले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याला विरोध असताना शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थांनात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली केली.

शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवत कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर अंबाबाईचा गोंधळ झाला. यानंतर राहूल सोलापूरकर यांनी बालगंधर्व प्रसंग सांगत नाट्य सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शाहूंच्या लहानपणीचे प्रसंग, एक राजा म्हणून दूरदृष्टी, वेदोक्त प्रकरण आणि महाराजांचे विचार, समाजसुधारक महाराज, साठमारी, कुस्ती आणि शाहू महाराज यांचा मृत्यू या मुद्द्यांवर भाष्य केले.

शाहीर प्रसाद विभूते यांनी शाहू महाराजांचे दत्तक विधान, राज्यारोहण, सामाजिक सुधारणा, साठमारी, कुस्ती या विषयांवर पोवाड्याचे सादरीकरण केले. ‘लोकराजा शाहू’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेणारे उद्योगपती व्ही. बी. पाटील, दिग्दर्शक सतीश रणदिवे यांनीही यावेळी चित्रपट निर्मितीवेळचे प्रसंग सांगितले. साक्षी परांजपे यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button