पिंपरी : बँकेचे हफ्ते सुरु; मात्र घरांची प्रतीक्षाच | पुढारी

पिंपरी : बँकेचे हफ्ते सुरु; मात्र घरांची प्रतीक्षाच

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडून गेल्या सात वर्षांत चौथ्यांदा अर्ज मागविण्यात आले असून, अद्याप एकाही लाभार्थ्यांला घर मिळालेले नाही; मात्र बँकांचे कर्ज काढल्याने दरमहिना हप्ते भरावे लागत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. मार्च महिन्यात घराचा ताबा देणार, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते; परंतु पालिका प्रशासन अंतिम टप्प्यातील कामे कासवगतीने करीत असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

2017 मध्ये मागवले अर्ज

पालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेसाठी फेब्रुवारी 2017 तील निवडणूक काळात ऑलनाइन अर्ज घेण्यात आले. अनेक उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात अक्षरश: रांगा लावून अर्ज भरले गेले. निवडणुकीत घरे देण्याचा मुद्द्याचे भांडवल करण्यात आले. त्यावेळेस एकूण 86 हजार 137 अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर पालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयात ऑफलाइन अर्ज घेतले.

उन्हात लांबपर्यंत रांगा लावून नागरिकांनी अर्ज भरले. त्या वेळेस 60 हजार 990 अर्ज मिळाले. त्यानंतर चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी व रावेत या तीन गृहप्रकल्पासाठी 5 हजार रूपयांच्या डीडीसह अर्ज मागविण्यात आले. त्यात 49 हजार 163 नागरिकांनी अर्ज भरले. आता आकुर्डी व पिंपरी या दोन गृहप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षांत चौथ्यांदा अर्ज मागविण्यात येत असले तरी, पालिकेस अद्याप एकाही लाभार्थ्यास घर देण्यात यश आलेले नाही.

शासनाची मंजुरी नसताना अर्ज मागविले

चर्‍होली व बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. तर, न्यायालयाच्या स्थगितीमुळे रावेत प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. आकुर्डी व पिंपरी येथील प्रकल्पांचे प्रयोजन बदलण्यास राज्य शासन मंजुरी देईल, या भरवशावर पालिकेने अर्ज मागविले आहेत. शासनाने प्रयोजन बदलण्यास नकार दिल्यास पालिकेची फजिती होऊन, अर्जदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

आकुर्डी, पिंपरीसाठी अनामत रक्कम दुप्पट

बोर्‍हाडेवाडी, चर्‍होली व रावेत प्रकल्पातील एकूण 3 हजार 664 घरांसाठी 5 हजार रूपये अनामत रक्कम डीडीसह अर्ज घेण्यात आले. तब्बल 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले. त्याची सोडत 11 जानेवारी 2021 ला काढण्यात आली. आकुर्डी व पिंपरी प्रकल्पातील 938 घरांसाठी आता अर्ज मागविले असून, त्यासाठी मागील अर्जापेक्षा दुप्पट म्हणजे 10 हजार रूपये अनामत रक्कम ऑनलाइन भरावी लागणार आहे.

…तर भाड्याच्या घरातून मुक्ती मिळेल

बँकेने कर्ज नाकाराल्याने फायनान्समधून जास्त व्याजाने कर्ज घेऊन रकक्कम भरली. एक वर्षे झाले तरी, अद्याप घर मिळालेले नाही. बँकेचा 7 हजार 500 रुपये हप्ता, घर भाडे व घर खर्च चालविणे अवघड होऊन बसले आहे. पालिकेने लवकरात लवकर घर दिल्यास घराच्या भाड्यातून मुक्ती मिळेल, असे लाभार्थी तुकाराम याने सांगितले.

घरभाडे देण्याचा नियम तपासला जाईल

सदनिका देण्यात विलंब झाल्यास लाभार्थ्यांस घर भाडे देण्याबाबत करारनाम्यात उल्लेख आहे का, हे तपासले जाईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली गृहप्रकल्पातील अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून, ती संपल्यानंतर तातडीने घरांचे वितरण केले जाणार आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

लाभार्थ्यांना भरावे लागताहेत कर्जाचे हप्ते

लाभार्थ्यांनी बँक कर्ज काढून चर्‍होली व बोर्‍हाडेवाडीतील घरांसाठी स्वहिस्सा भरला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत घर दिले जाईल, असे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले. जून महिना उजाडला तरी, अद्याप घर मिळाले नाही. मात्र, हप्ते भरावे लागत आहेत. घरभाड्यासह वर्षभरापासून हप्ते भरून, घरखर्च भागवावा लागत असल्याने लाभार्थ्यांना अर्थिक कसरत करावी लागत आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अंतिम टप्प्यातील कामे सुरू असल्याने सदनिकांचे वाटप करता येत नसल्याचे उत्तर देऊन अधिकारी हात झटकत आहेत. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेले लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

आर्थिक ओढाताण

एका वर्षांपूर्वी कर्ज काढून सर्व रक्कम भरली. 31 मार्च 2023 पर्यंत घरांची चावी देणार असे पत्र पालिकेने दिले होते. मात्र, अद्याप घर दिलेले नाही. बँकेचा 7 हजार रूपये हप्ता आणि घरभाडे 5 हजार रूपये अशी आर्थिक ओढाताण सहन करत कुटुंब चालवावे लागत असल्याचे रिक्षाचालक रहीम याने सांगितले.

कामे पूर्ण होण्यास किमान 2 महिने लागतील

चर्‍होली व बोर्‍हाडेवाडी प्रकल्पात पाणीपुरवठा व ड्रेनेजलाइनचे काम झाले आहे. प्रत्येक सदनिकेचे वीज मीटर बसविणे, विद्युत केबल, फायर फायटींग यंत्रणा यांची कामे सुरू आहेत. ती कामे झाल्यानंतर काँक्रीटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. सर्व कामे झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यात येईल. यासाठी किमान 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.

Back to top button