सोलापूर : खुडूसमध्ये वैष्णव भक्तिरसात ‘चिंब’ | पुढारी

सोलापूर : खुडूसमध्ये वैष्णव भक्तिरसात ‘चिंब’

पानीव; विनोद बाबर : 

याची देही याची डोळा
आज पाहिला रिंगण सोहळा
अश्व धावले रिंगणी
होता टाळ मृदुंगाचा ध्वनी
हरिनामाच्या जयघोषाने
गेले रिंगण रंगुनी!!

ज्ञानोबा – माऊली – तुकाराम अशा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ मृदंगाचा गजर, डौलाने फडकणार्‍या भगव्या पताका, अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी उडालेली झुंबड, देहभान वय विसरून नाचणारे भाविक अशा चैतन्यदायी वातावरणात रिमझिम पावसात माऊलीच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पानीवपाटी (खुडूस) येथे पार पडले. लाखो वैष्णवांनी हा रिंगणसोहळा व पाठशिवीचा खेळ नयनात साठवून ठेवला. पंढरीच्या विठुरायाच्या ओढीने आळंदी येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने माळशिरसकरांचा निरोप घेऊन खुडूसच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सकाळपासूनच पानीव पाटी येथील मैदानावर वारकरी व परिसरातील ग्रामस्थांनी रिंगणसोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सकाळी 8.31 वाजता सजविलेल्या चांंदीच्या रथातील पालखीचे आगमन झाल्यानंतर खुडूस ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. माऊलीचा अश्व व स्वराचा अश्व वारकरी मैदानात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ पताकाधारी व माऊलीच्या पालखीचे 8.46 वाजता मैदानात आगमन झाले. बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार व उद्धव चोपदार यांनी रिंगण लावले. पालखी रथातून उचलून रिंगणाच्या मधोमध आणली. पालखीला मुख्य रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी खांदा देण्यासाठी झुंबड उडली. पोलिसांनी अगोदरच चोख बंदोबस्त लावला होता. रथापुढील मानाच्या पताकाधारी वारकरी पालखीभोवती गोल कडे करून उभे राहिले, त्यानंतर 8.53 वाजता मुख्य रिंगण सोहळा सुरू झाला. चोपदारांनी अश्वाला रिंगण दाखविले. सकाळपासून रिंगण सोहळा पाहण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या नजरा आता माऊलीच्या अश्वाकडे लागल्या इतक्यात स्वराचा अश्व रिंगणात दाखल झाला अन् माऊलीच्या जयघोषाने व टाळ्यांंनी आसमंत दणाणून गेला.

भोपळे दिंडीतील मानकर्‍याने जरी पटक्याचा ध्वज घेऊन एक फेरी पूर्ण केली. स्वराचा अश्व पुढे व त्यापाठोपाठ माऊलीचा अश्व काही क्षणात दोन्ही अश्वांनी दोन फेर्‍या पूर्ण करून लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी अश्वांच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणाच्या मधोमध ठेवलेल्या पालखीजवळ आले. रिंगण सोहळानंतर फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ खेळण्यात महिला व पुरुष वारकरी देहभान विसरून मग्न झाले.

Back to top button