Latest

Meta कडून कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! Facebook, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राममध्ये आणखी नोकरकपात

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मेटा प्लॅटफॉर्म्स इंक पुन्हा एकदा नोकरकपात करत आहे. ब्लूमबर्ग न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने व्यवस्थापकांना मेमो जारी करत नोकरकपात करण्याची सूचना दिली आहे. या नोकरकपातीच्या फेरीत फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) आणि रिॲलिटी लॅबमधील कर्मचारी असतील, असे संकेत कंपनीने दिले आहेत.

मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मार्चमध्ये जाहीर केले होते की नोकरकपात ही खर्च कमी करण्याच्या उपायांचा एक भाग आहे ज्यामुळे कंपनीतील १० हजार पदे कमी होतील. मे महिन्यात नोकरकपातीची आणखी एक फेरी सुरू होणार आहे.

मेटाने नोव्हेंबरमध्ये सुमारे १३ टक्के कर्मचारी म्हणजेच ११ हजार नोकर्‍या कमी केल्या आहेत. कंपनीच्या व्यवस्थापकांना जारी केलेल्या मेमोमधून सूचित करण्यात आले आहे की टीम्सची पुनर्रचना केली जाईल आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना नवीन व्यवस्थापकांच्या अंतर्गत काम करण्यासाठी पुन्हा नियुक्त केले जाईल.

टार्गेटेड जाहिरातींच्या श्रेणीतील अधिक निर्बंधांमुळे मेटाच्या कमाईत घट झाली आहे. याचा परिणाम कंपनीच्या जाहिरातींच्या उत्पन्नावर झाला आहे. मेटाव्हर्स हा नवीन प्लॅटफॉर्मदेखील अद्याप महसूलापासून दूर आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी २०२३ हे वर्ष कंपनीसाठी 'कार्यक्षमतेचे वर्ष' (year of efficiency) म्हणून घोषित केले आहे. कंपनीने कर्मचार्‍यांच्या अलीकडील कामगिरीचा आढावादेखील घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमावणार असल्याची चिंता लागली आहे.

टेक कंपन्यांत मोठ्या प्रमाणात नोकरकपात

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर Accenture, Amazon, Meta आणि इतर टेक कंपन्यांनी यावर्षी मोठ्या नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. ॲमेझॉनने २७ हजार, मेटा २१ हजार, Accenture १९ हजार, अल्फाबेट १२ हजार, सेल्फफोर्स ८ हजार, मायक्रोसॉफ्ट १० हजार, एचपी ६ हजार, आयबीएम ३,९००, ट्विटर ३,७०० आणि Seagate ने ३ हजार जणांना कामावरुन काढून टाकले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT