बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. या कारवाईनंतर एनसीबीचे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात आहेत. समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद वाढतच चाललाय. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामाच ट्विट केला.
वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केला होता. या निकाह नाम्यात समीर दाऊद वानखेडे या नावाचा उल्लेख दिसतो. ७ डिसेंबर २००८ रोजी समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झाला होता, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली. यावर आता समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खुलासा केला. नवाब मलिक यांनी वैयक्तिक जीवनात जाऊ नये. समीर आणि पहिल्या पत्नीतील घटस्फोट कायदेशीर होता, असा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला. तर समीर यांची पत्नी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने, "माझे पती हिंदू आहेत आणि ते अजूनही हिंदूच आहे. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं आणि पुरावे दाखवावेत. माझ्या लग्नाचं राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे", अशी आक्रमक भूमिका घेतलीय.
क्रांती रेडकर ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेल्या समीर वानखेडे यांच्याशी २०१७ साली क्रांतीनं लग्न केलं. गुपचूप लग्न करुन त्यावेळी तिने मराठी सिनेसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला होता. क्रांतीच्या जवळच्या मैत्रिणी आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत क्रांती आणि समीर यांनी शुभमंगल केले होते. समीर आणि आपण लग्नाआधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे क्रांतीनं त्यावेळी म्हटलं होतं. आपल्याला समजून घेणारा साथीदार मिळाला. मी लग्नानंतरही सिनेसृष्टीत काम करत राहीन, असेही तिने म्हटले होते. कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालायला लागली…या गाण्यावर क्रांती रेडकरनं अनेकांना थिरकायला लावले होते. तिने लग्नानंतर क्रांती रेडकर वानखेडे असे नाव लावले. समीर आणि क्रांती यांना दोन जु्ळ्या मुली आहेत.
क्रांतीवर (Kranti Redkar) आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप याआधी झाला होता. २०१३ मधील ही गोष्ट आहे ज्यावेळी श्रीशांत स्पॉट फिक्सिंगच्या रडारवर होता. पण, या प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नसल्याचा खुलासा क्रांतीनं केला होता. श्रीशांतला आपण कधीही भेटलेच नाही. यामुळे स्पॉट फिक्सिंगशी माझा संबंध कसा काय? असा सवालही तिने केला होता.
क्रांती रेडकरचं मुंबईची असून तिचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. २००० साली तिने 'सून असावी अशी' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर प्रकाश झा यांच्या गंगाजल चित्रपटात तिने छोटी भूमिका साकारली. क्रांतीने 'जत्रा', 'ऑन ड्युटी २४ तास', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', 'माझा नवरा तुझी बायको' या चित्रपटांत काम केले आहे. तिने 'काकण' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
तर क्रांतीचे पती समीर वानखेडे हे मुंबईतील कडक अधिकारी म्हणून नेहमी चर्चेत राहिले आहेत. गायक मिका सिंग याला २०१३ मध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशी चलनासह विमानतळावर पकडले होते. ही कारवाई समीर यांनी केली होती.