बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'छाताडावर बसून मराठा आरक्षण घेऊ, मराठ्यांचे शांततेत चाललेले युद्ध थांबविण्याची ताकद कोणातच नाही. मराठ्यांचे हे युद्ध 24 तारखेनंतर झेपणार नाही. फक्त मराठ्यांनी आता गाफिल राहू नये, आपण छत्रपतींचे मावळे आहोत. सावध राहून संघर्ष करू. त्यासाठी पक्ष, गटतट, मतभेद बाजूला ठेवा. पण आता आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही,' असा इशारा मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बारामतीत मराठा क्रांती मोर्चातर्फे जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला विराट गर्दी झाली.
जरांगे पाटील म्हणाले, 'काहींना 1967 ला रात्रीत आरक्षण दिले गेले. 1990 ला तेच घडले. मग मराठ्यांना आरक्षण देताना वेगळा कायदा का? अहवालातून आम्ही 12 टक्के मागास आहोत, मग आम्हाला आरक्षण का नाही? विदर्भात व्यवसायाच्या आधारावर आम्हाला आरक्षण दिले, मग आमचा व्यवसाय काय आहे हे माहीत नाही का?' असा सवाल त्यांनी केला.'आपल्यातील काही नमुन्यांना आरक्षण माहीत होते;
परंतु त्यांनी ते आपल्याला शिकवले नाही. हुशार होऊ दिले नाही. त्यामुळे आपल्या पिढ्या बरबाद झाल्या. त्यामुळे आंदोलन कोणतेही असो त्याच्या मुळाशी जा. मागच्या पिढीने पोर-पोरी शिकवतानाच हा विचार करायला हवा होता. जीवन जगताना जसे पाणी आवश्यक असते तसे आता समाजासाठी आरक्षण गरजेचे झाले आहे,' असे सांगून जरांगे पाटील म्हणाले, 'आता आपल्याला चारही बाजूने घेरले आहे. आरक्षण मिळू द्यायचे नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
'पुरेसे पुरावे असल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र देता येत नसल्याचे सांगितले जात आहे. मग तुमची जात ओबीसीत कशी गेली, कोणत्या आधारे गेली हे सांगा,' असा सवाल करून जरांगे पाटील म्हणाले, 'एका रात्रीत आरक्षणाच्या यादीत जाती घुसविल्या गेल्या. मंडल आयोगाच्या आरक्षणात अन्य पोटजाती घुसल्या, मग मराठ्यांचीच पोटजात कुणबी का होऊ शकत नाही?, याचे उत्तर त्यांनी द्यावे.'
हेही वाचा