‘हेल प्लॅनेट’च्या गूढ सिग्नल्सचे उलगडले रहस्य

‘हेल प्लॅनेट’च्या गूढ सिग्नल्सचे उलगडले रहस्य
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीपासून सुमारे 40 प्रकाशवर्ष अंतरावर खडकाळ पृष्ठभूमीचा एक ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा आठपट मोठ्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला '55 कँक्री' असे नाव आहे. मात्र, त्याच्यावरील ज्वालामुखी व अत्यंत तप्त वातावरण पाहून त्याला नरकाची उपमा देत 'हेल प्लॅनेट' असेही म्हटले जाते. या ग्रहापासून गेल्या वीस वर्षांच्या काळात अनेक गूढ सिग्नल्स आले आहेत. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने या सिग्नल्सचे रहस्य उलगडण्यात यश मिळवले आहे.

या ग्रहाचा शोध 2004 मध्ये लावण्यात आला होता. तो आपल्या तार्‍याच्या अतिशय जवळ असून त्याचे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यानच्या अंतरापेक्षा दोन टक्के कमी आहे. त्याला आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ सतरा तास लागतात. त्यामुळे त्याच्यावरील वातावरण अतिशय खडतर असेच आहे. या ग्रहाबाबतच्या संशोधनाची माहिती आता 'अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे. त्यामध्ये विशेषतः त्याच्या विचित्र अशा सिग्नल्सची माहिती आहे. हे सिग्नल्स म्हणजे हा ग्रह त्याच्या तार्‍यासमोरून जात असताना पृथ्वीवरून त्याचे ग्रहण दिसते त्यावेळेचा प्रकाश आहे.

काही वेळा हा प्रकाश अजिबात दिसत नाही व काहीवेेळा अतिशय तीव्र स्वरूपात दिसतो. इन्फ्रारेड लाईटमध्ये नेहमीच सिग्नल्स असतात. अर्थात या सिग्नल्सच्या शक्तीत अनेक फरक असतात. स्पित्झर स्पेस टेलिस्कोपने यापूर्वी त्याचे निरीक्षण केले असता या ग्रहावर दिवसाच्या वेळी तब्बल 2427 अंश सेल्सिअस इतके भयावह तापमान असते असे दिसून आले. रात्रीच्या वेळी ते तुलनेने कमी म्हणजे 1127 अंश सेल्सिअस असते. आता नव्या संशोधनात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने त्याच्या सतत बदलत असलेल्या वातावरणाचे निरीक्षण केले असून त्यामधूनच त्याच्या या विचित्र सिग्नल्सचे रहस्यही उलगडले आहे.

अन्य ग्रहांप्रमाणे या ग्रहाचे वातावरण स्थिर नाही. याचे कारण म्हणजे त्याच्यावर अनेक मोठे ज्वालामुखी असून त्यांचा सतत उद्रेक होत असतो. त्यामधून उष्ण असे कार्बनसंपन्न घटक वातावरणात मिसळत असतात. अतिउष्ण तापमानामुळे हा ग्रह आपले वातावरण टिकवून धरू शकत नाही. ज्वालामुखीतील वायू सातत्याने बाहेर उत्सर्जित होत असतात. तीव्र रेडिएशन आणि जवळच्या तार्‍यापासून येणारी सौरवादळे हे वायू उडवून लावतात. मात्र, या प्रक्रिया संतुलित नसतात. त्यामुळे कधी या ग्रहाभोवती वायूंचे वातावरण असते व कधी नसते. याच असंतुलनामुळे त्याच्यापासून येणारे सिग्नल्सही संतुलित नसतात. जेम्स वेब टेलिस्कोपने त्याच्या वातावरणातील दाब आणि तापमानाचे मोजमाप करण्यात यश मिळवले आहे. त्यावरून आता या ग्रहावर कधी वातावरण आहे व कधी नाही हे समजू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news