Latest

Maharashtra Politics : राष्ट्रवादीची ‘राजकीय दिवाळी’ अन् शक्यतांची ‘आतषबाजी’

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या शाब्दिक युद्धाला 24 तास होण्याच्या आत दोन्ही गटांच्या सर्वोच्च नेत्यांची दिवाळीच्या नावाखाली भेट झाल्याने या राजकीय दिवाळीत विविध राजकीय शक्यतांची आतषबाजी सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)

शरद पवार यांच्याशी भेटीनंतर लगेच दिल्लीत जाऊन अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पक्ष फुटल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत पवार काका-पुतण्याच्या आजच्या दुसर्‍या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात आणखी नवा भूकंप तर होणार नाही ना, अशी चर्चाही रंगू लागली आहे. पुण्यातील बाणेर परिसरातील प्रतापराव पवार यांच्या घरी शुक्रवारी पवार कुटुंब एकत्र आले. प्रतापराव पवारांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस आणि दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

संबंधित बातम्या :

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील प्रमुख सदस्यांनी या दिवाळी स्नेहमिलनास हजेरी लावली. यापूर्वीही 12 ऑगस्ट रोजी अजित पवारांनी शरद पवार यांची उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील बंगल्यावर गुप्त भेट घेतली. यावेळी काका-पुतण्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते.

नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
याप्रसंगी शरद पवार आणि अजित पवार यांची स्वतंत्र भेट झाल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांच्या भेटीत नेमक्या कोेणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दल कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या भेटीत नेमके काय घडले हे मी सांगणार नाही, असे सूचक वक्तव्य करीत सुप्रिया सुळे यांनी भेटीचे रहस्य अधिकच वाढविले. मात्र, या भेटीनंतर अजित पवार लगेच दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राज्यात काही नवे राजकीय समीकरण तर आकाराला येत नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)

SCROLL FOR NEXT