Maharashtra Politics : “माफीनामा…! असे ओरडत भाजपने…” : सुप्रिया सुळेंचा हल्‍लाबाेल

Maharashtra Politics : “माफीनामा…! असे ओरडत भाजपने…” :  सुप्रिया सुळेंचा हल्‍लाबाेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.२०) कंत्राटी भरती जीआर रद्द करण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात कंत्राटी भरतीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत कंत्राटी पद्धतीवरुन जोरदार हल्लाबाेल केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे."(Maharashtra Politics)

ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल

सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की,  "भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफीनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पूर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्याबराेबर सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे 'हवाबाण' सोडण्याची हिंमत केली नसती. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

२०११ सालातील मंत्री
1. विजयकुमार गावीत, 2. राधाकृष्ण विखे पाटील, 3. अजित पवार, 4. नारायण राणे, 5. दिलीप वळसे पाटील, 6.छगन भुजबळ, 7. सुनील तटकरे, 8. हसन मुश्रीफ
महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री 
1. एकनाथ शिंदे 2. अजित पवार, 3. दिलीप वळसे पाटील, 4. छगन भुजबळ, 5. उदय सामंत, 6. धनंजय मुंडे, 7. शंभूराज देसाई, 8. गुलाबराव पाटील, 9. दादा भुसे, 10. संजय राठोड, 11. संदीपान भुमरे, 12 अब्दुल सत्तार, 13. संजय बनसोडे, 14. आदिती तटकरे

Maharashtra Politics : काय म्हणाले होते फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर शुक्रवार (दि.२०) रद्द करत असल्याची घोषणा केली. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की," राज्य़ात काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने पहिल्यांदा कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सरकारकडून ६ हजार कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हा निर्णय पुढे कायम ठेवला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता विरोधकांनी युवकांची दिशाभूल करू नये. ठाकरे आणि पवारांनी आपले पाप आमच्या डोक्यावर मारू नये. युवकांची दिशाभूल केल्याप्रकऱणी ठाकरे आणि पवार माफी मागणार का ?, असा सवाल करून मविआचे पाप आमच्या माथी आम्ही घेणार नाही. आपणच निर्णय घ्यायचा आणि त्याविरोधात आंदोलन करायचे हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करायला लाज कशी वाटत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तरुणांच्या मनात असंतोष पसरविला जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news