Latest

सभासद फी भरा अन् मान्यता ‘विसरा’; एमओएचा नवा फतवा

अमृता चौगुले
पुणे : राज्यात विविध खेळांच्या संघटना कार्यरत आहेत. या संघटनांची शिखर संघटना म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) काम करीत आहे. या एमओएचे सभासदत्व घेण्यासाठी कराटे संघटनेकडून पैसे घेतले गेले. परंतु, अद्यापही कराटे संघटनेला मान्यता देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. सभासद फी भरा अन् मान्यता 'विसरा', असा नवा 'फतवा' एमओएने काढला आहे का? अशी चर्चा खेळाडूंमध्ये सुरू आहे.
एमओएमध्ये कोणत्याही खेळाच्या राज्य संघटनेला सभासदत्व पाहिजे असेल तर त्यासाठी एमओएकडे नोंदणी अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची फीच एमओएने तब्बल 25 हजार रुपये ठेवली आहे. या अर्जावर एमओएच्या छाननी समितीमध्ये संघटनेला मान्यता न देण्याबाबत निर्णय झाल्यास 25 हजार रुपयांचा फटका संबंधित संघटनेला बसत आहे. अशाच प्रकार कराटे-डु-असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्याबाबतीत घडली आहे.
एमओएच्या नियमानुसार ज्या राज्य संघटनेला राष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे त्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची (आयओए) मान्यता आवश्यक आहे. मात्र, एमओएच्या वतीने दोन्ही संघटनांना आयओएची मान्यता नसतानाही केवळ महाराष्ट्र कराटे असोसिएशनलाच मान्यता दिली आहे. कराटे-डु-असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने एमओएचे अध्यक्ष अजित पवार यांनाही याबाबत कल्पना देऊनही केवळ 25 हजार रुपयांची नोंदणी फी घेऊन त्यांना मान्यता देण्यात येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे एमओएच्या नियमानुसार आगामी काळात खर्‍या संघटनांना न्याय मिळेल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र कराटे असोसिएशनला आयओए, केंद्र सरकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी कोणाचीही मान्यता नाही. याउलट कराटे-डु-असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेला केंद्र सरकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे. आयओएसमोर मान्यतेचा विषय प्रलंबित आहे. असे असतानाही आमच्याकडून 25 हजार रुपयांची फी घेऊनही आमची मान्यता रद्द केलेली आहे. आगामी काळात संघटना म्हणून यावर नक्कीच आक्रमक होणार आहोत.
– संदीप गाडे, सचिव, कराटे-डु-असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
कराटे-डु-असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मान्यतेसाठी अर्ज मिळाला होता. त्यापोटी 25 हजार रुपयांची पावती करून घेण्यात आली आहे. हा अर्ज छाननी समितीसमोर ठेवला. मात्र, समितीने मान्यता न देण्याबाबतचा अहवाल दिला आहे. महाराष्ट्र कराटे असोसिएशनला 2005 सालापासून मान्यता दिलेली आहे. मध्यंतरी त्यांना स्थगिती देण्यात आली होती ती उठविण्यात आली. त्या संघटनेच्या मान्यतेचा विषय येत नाही. दरम्यान, आयओएच्या मान्यतेबाबत पुन्हा एकदा एमओएच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
– नामदेव शिरगावकर, सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन
हेही वाचा
SCROLL FOR NEXT