Latest

शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्यात २ तास खलबते! बंडखोरांचे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी ठरली रणनिती

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मातोश्रीवर शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. यात उभय नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या बंडाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरले असल्याचे समजते.

शिवसेना फोडण्याचे आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल. त्यामुळे हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी हिमतीने उभे राहा. आमदार फुटले असतील तरी त्यांना परत आणण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हीही सक्रिय व्हा आणि शिवसैनिकांनाही सक्रिय करा, असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्याचा निर्धार करण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बंडाळीनंतरची ही त्यांची दुसरी भेट होय. यावेळी सर्व नेत्यांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती तसेच या परिस्थितीत काय रणनीती आखायची यावर चर्चा करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. मात्र पवारांनी त्यांना रोखले. त्यानंतर शरद पवार यांनी आता सरकार टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांविरोधात शुक्रवारपासून स्थानिक पातळीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या बैठकीत पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसैनिकांना अधिक आक्रमक करावे, जेणेकरून त्यांच्यावर पक्षात परतण्याचा दबाव वाढेल, असा सल्लाही पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचा ठाम पाठिंबा असल्याचा विश्वासही पवार यांनी ठाकरे यांना दिला.

SCROLL FOR NEXT