Latest

महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे; प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाची जोरदार तयारी

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार असून यंदा "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि 'स्त्रीशक्ती जागर' ही चित्ररथाची संकल्पना आहे. सध्या नवी दिल्लीत हा चित्ररथ साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आप आपल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. (Maharashtra Chitrarath 2023 )

Maharashtra Chitrarath 2023 : स्त्रीशक्ती जागर'  संकल्पना

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे तसेच त्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना घरबसल्या होणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत 'शुभ एड'चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT