पुढारी ऑनलाईन : चीनमधील हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) बुधवारी महिला बॉक्सिंगच्या ७५ किलो वजनी गटात भारताच्या लव्हलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिचा अंतिम फेरीत चीनच्या ली कियान हिच्याकडून पराभव झाला. (Lovlina Borgohain vs Li Qian) लव्हलिनाच्या रौप्यपदकामुळे भारताच्या पदकांची एकूण संख्या ७४ झाली आहे.
ऑलिम्पिक पदक विजेती आणि वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या लव्हलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत थायलंडच्या बायसन मनीकोनचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. या विजयामुळे भारताच्या लव्हलिनाने पॅरिस २०२४ ऑलिम्पिक कोटादेखील मिळवला होता.
संबंधित बातम्या
आशियाई क्रीडा स्पर्धेत लव्हलिनाला १६ च्या राउंडमध्ये बाय मिळाला होता. तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रजासत्ताक कोरियाच्या सुयोन सेओंगचा पराभव केला होता.
लव्हलिनाची प्रतिस्पर्धी ली कियान ही माजी वर्ल्ड चॅम्पियन असून तिने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. तिने उपांत्य फेरीत व्हिएतनामच्या लू डिएम क्विन्हचा पराभव केला होता. ली कियान ही दोन वेळा आशियाई चॅम्पियनदेखील आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने इंचॉन २०१४ मध्ये रौप्यपदक मिळवले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनच्या उपांत्य फेरीत ली कियान आणि लव्हलिना आमने-सामने आल्या. यात ४:१ च्या निर्णयानंतर लव्हलिनाने अव्वल स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले होते. (Asian Games 2023)
बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून आधीच भारताचे पदक निश्चित केले होते. तर भारताच्या प्रीती पवारने बॉक्सिंगच्या महिलांच्या ५४ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
दरम्यान, तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिकमध्ये ज्योती आणि ओजस यांनी भारताला आज ७१वे पदक मिळवून दिले. आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील भारताची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती.
हे ही वाचा :