Asian Games 2023 : 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये भारताच्या महिला खेळाडूंचा ‘डबल धमाका’! रौप्य आणि कांस्यपदकावर जिंकले | पुढारी

Asian Games 2023 : 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये भारताच्या महिला खेळाडूंचा ‘डबल धमाका’! रौप्य आणि कांस्यपदकावर जिंकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) रविवारी सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला होता. त्यानंतर सोमवारी याच स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी मैदान गाजवले. पारूल चौधरीने (वेळ : 9 मिनिटे 27.63 सेकंद) रौप्यपदक तर प्रिती लांबा ( वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) हिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

भारत 13 सुवर्ण, 22 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह पदक क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम आहे. ‘यंदा 100 मेडल पार’ हे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आज 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 9व्या दिवसाची सुरुवात 3 कांस्य पदकांनी झाली. स्पीड स्केटिंगमध्ये प्रथम भारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले, त्यानंतर पुरुष संघानेही कांस्यपदक जिंकले. यानंतर महिला दुहेरीत टेबल टेनिसमध्येही कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीचा कोरियाकडून 4-3 असा पराभव झाला.

पुरुष हॉकीमधील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताचा सामना सध्या बांगलादेशशी होत आहे. कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाची सध्या चायनीज तैपेईशी स्पर्धा आहे. बॅडमिंटन एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्विक साईराज, रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने विजयासह पुढील फेरी गाठली आहे.

 

Back to top button