नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. विशेषत: कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये 'मनसे' फॅक्टर प्रभावी ठरेल? असा दावा केला जात आहे. त्यासाठी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचे दाखले दिले जात आहेत. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, मनसेचा करिष्मा नाशिककरांना किती भावणार असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा केली. कडव्या मराठीपणाचा अजेंडा समोर ठेवून त्यांनी मनसेचा झंझावात महाराष्ट्रात निर्माण केला. याच जोरावर २००७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या मनसेच्या झोळीत नाशिककरांनी भरभरून मते टाकली. शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि पूर्वाश्रमीचे मनसे नेते हेमंत गोडसे यांना मनसेनी लोकसभेच्या मैदानात उतरविले होते. मनसेचा झंझावात पाहता हेमंत गोडसे यांनी तब्बल दोन लाख १६ हजार ४७४ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार समीर भुजबळ यांना चांगलाच घाम फोडला होता. अवघ्या २२ हजार ३२ मतांनी गोडसे यांचा पराभव झाला होता. मनसेच्या या दमदार कामगिरीच्या बळावर २००९ मध्येच घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अधिकृत रेल्वे इंजीन हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेे. पुढे या चिन्हावर नाशिककरांनी मनसेचे एक दोन नव्हे तर तब्बल तीन आमदार निवडून दिले.
मनसेचा हा झंझावात २०१२ च्या नाशिक महापालिका निवडणुकीतदेखील दिसून आला. या निवडणुकीत नाशिककरांनी मनसेचे तब्बल ४० नगरसेवक निवडून देत महापालिकेत सत्ता मिळवून दिली. मात्र, यानंतर मनसेला उतरती कळा सुरू झाली. सर्वच प्रमुख स्थानिक नेत्यांनी हळूहळू मनसेची साथ सोडल्याने, मनसेला नाशिककरांनी दिलेले वैभव टिकवून ठेवणे अवघड होऊन गेले. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना अवघी ६३ हजार ५० मतेच मिळविता आली. तर मनसेतून शिवसेनेत गेलेल्या हेमंत गोडसे यांनी ४ लाख ९४ हजार ७३५ मिळवत विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीत त्यांनी मनसेचा उमेदवार जवळही येऊ न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. मनसेला मात्र, येथून जनाधार टिकवून ठेवणे शक्य झाले नाही. परिणामी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. याशिवाय महापालिकेतही अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेनी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी, त्याचा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार काय, या प्रश्नाचे उत्तर निकालाअंतीच स्पष्ट होईल.
मनसेची लोकसभेतील कामगिरी
– सन २००९ – हेमंत गोडसे – २,१६,६७४
– सन २०१४ – डॉ. प्रदीप पवार – ६३,०५०
नाशिकला होणार सभा?
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याची घोषणा केल्यानंतर ते महायुतीच्या प्रचारासाठी राज्यभरात सभा घेतील असे बाेलले जात आहे. नाशिकमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसांत राज ठाकरे प्रमुख नेत्यांची बैठक घेणार असून, त्यामध्ये याबाबतचे नियोजन ठरविण्यात येईल. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये त्यांच्या सभा होतील, असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: