Lok Sabha Election 2024 : सोलापुरात चौरंगीची चिन्हे; ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’मुळे मतविभागणी अटळ

Lok Sabha Election 2024 : सोलापुरात चौरंगीची चिन्हे; ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’मुळे मतविभागणी अटळ
Published on
Updated on

सोलापूर लोकसभा निवडणूक आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. आरंभी महायुती व महाआघाडीदरम्यान लढत होईल, असे वाटत असतानाच या निवडणूक रिंगणात आता वंचित बहुजन आघाडी उतरत आहे. त्यातच 'एमआयएम'ही उमेदवार उभा करण्याच्या हालचाली गतीने करत आहे. यामुळे सोलापुरात मतविभागणी अटळ झाली आहे. याचा नेमका कुणाला फायदा होणार अन् कुणाचे नुकसान होणार, हे मात्र येणारा काळच सांगू शकेल.

चैत्र महिन्यातील तप्त उन्हाच्या तडाख्याबरोबरच सोलापूर लोकसभा निवडणुकीचा राजकीय आखडा आता चांगलाच तापू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांचे शड्डू दोन्ही उमेदवारांकडून जोरकसपणे ठोकण्यात येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस मित्रपक्षांच्या महाआघाडीकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तथा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाचे तब्बल तिसर्‍यांदा प्रतिनिधित्व करत असलेल्या आ. प्रणिती शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध दीर्घप्रतीक्षेनंतर अखेर भाजप महायुतीने माळशिरस विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. राम सातपुते यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

या दोघांकडून प्रचाराची राळ मोठ्याप्रमाणात उडवली जात आहे. कधी आसपासच्या गावांमध्ये तर कधी विविध विधानसभा मतदार संघांमध्ये जात उमेदवार प्रचार करत आहेत. मॉर्निंग वॉकची ठिकाणे असो किंवा विविध जाती-धर्म-पंथीयांचे सणसमारंभ असतील त्या ठिकाणी उमेदवार आवर्जून हजेरी लावत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही प्रचारात मग्न आहेत. सोशल मीडियाच्या टीममध्ये सध्यातरी महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दुसर्‍या बाजूला सत्ताधारी विविध नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर भाजप महायुतीचे आ. सातपुते यांची भिस्त दिसून येत आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये अनुक्रमे सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्क्लकोट, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व ठिकाणांपैकी फक्त सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. बाकी सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये भाजप व मित्रपक्षांचा वरचष्मा आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड होईल, अशी परिस्थिती होती. परंतु, आता आ. प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा चांगलाच जोर धरल्याने व त्यांनी थेट पंतप्रधान मोदी, सोलापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या गेल्या दहा वर्षांतील भाजपच्या दोन खासदारांचा नाकर्तेपणासह इडी, जातीयवाद यासारख्या मुद्द्यांवर तुटून पडत आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. त्यातच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आ. शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ माकपला सोडण्याबाबत सोनिया गांधी व सीताराम येचुरी यांच्यामध्ये चर्चा झाल्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे आडम यांनी स्पष्ट केले आहे. त्याचा निश्चितच फायदा काँग्रेसला होणार आहे.

असे असले तरी या निवडणुकीला आता तिसरा आणि चौथा कोनही प्राप्त झाला आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रिंगणात राहुल गायकवाड यांना उतरवले आहे. त्यातच आता 'एमआयएम' पक्ष मोहोळचे माजी आ. रमेश कदम यांना निवडणूक रिंगणात उभा करण्यासाठी गतिमान हालचाली करत आहे. या पक्षाच्या शहराध्यक्षांसह विविध नेत्यांनी मीडियास तसे स्पष्टपणे सांगत माजी आ. कदम यांच्या गाठीभेटीची छायाचित्रेही व्हायरल केली आहेत. या दोन उमेदवारांमुळे आता सोलापूर मतदार संघात मतविभाजणी अटळ आहे. या मतविभागणीचा महायुती की महाविकास आघाडीस फायदा होणार की तोटा होणार हे येणारा काळच सांगू शकेल हे मात्र खरे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news