राजगुरुनगर: पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यामध्ये युरिया खताची वानवा असून खत घेऊन येणारे वाहन वितरकाकडे आल्यानंतर भर उन्हात दुकाना बाहेर शेकडो शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खेड तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी, भुईमूग आणि जनावरांचा हिरवा चारा ही पिकं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलेली आहेत. तालुक्यात चास कमान, भामा आसखेड आणि कळमोडी या धरणांचे पाणी आहे. त्याचबरोबर कालवा आणि नदीपात्राच्या लगत असलेल्या शेतीमध्ये उन्हाळी पिके घेतली जात आहेत. उन्हाळ्यात या पिकांसाठी युरिया खताची मात्रा दिल्यास पिकांची वाढ जोमात होते. त्यामुळे या खताला मोठी मागणी असते.
मात्र वितरकाकडे खताची तेवढ्या प्रमाणात आवक होत नाही. आवक झाल्यानंतर त्याची माहिती मिळताच खत विकत घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी होते. भर उन्हात रांगेत उभे राहिल्यानंतर देखील सर्वांना खते मिळण्याचे प्रमाण कमी आहे. अर्ध्या रांगेतील शेतकऱ्यांना खते मिळतात तर अर्धे शेतकरी नाराज होऊन घरी परत जातात. खेड तालुक्यात जेवढा युरिया गरजेचा आहे तेवढी आवक होत नसल्याने शेतकऱ्यांना तीष्ठत राहावे लागत आहे. अनेकदा खत मिळत नसल्याने अनेक शेतकरी हतबल होत आहेत. शासनाने युरिया खताची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्याचबरोबर राजगुरुनगर येथील वितरक डी बी करणावट यांनी देखील खताची आवक जेवढी मागणी त्या प्रमाणात होत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी ओढुन घ्यावी लागत असल्याचे सांगितले.
हेही वाचा