बारामती : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचाराची खोटी फिर्याद देणार्या दोन महिलांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांनी चांगलाच धडा शिकवला. या दोन्ही महिलांना न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला. दंडाची ही रक्कम पोलिस कल्याण निधीमध्ये जमा करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. 12 ऑगस्ट रोजी एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर दि. 24 ऑगस्ट रोजी दुसर्या एका महिलेने मारहाण करत लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल केली. हे दोन्ही गुन्हे महिलांशी संबंधित व गंभीर स्वरूपाचे असल्याने बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली.
संबंधित बातम्या :
दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी बारामतीच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या वेळी फिर्यादींनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. रागाच्या भरात गैरसमजुतीतून फिर्याद दाखल केल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले. तपासी अधिकार्यांनी दाखल केलेले म्हणणे व फिर्यादींचे प्रतिज्ञापत्र यावरून महिलांनी पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यापोटी त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा केली. हा दंड त्यांना पोलिस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी काम पाहिले. हवालदार अभिमन्यू कवडे यांनी सरकार पक्षाला साहाय्य केले.